देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मारकाचा आज शिलान्यास समारंभ
निमशिरगाव/प्रतिनिधी : थोर स्वातंत्र्यसेनानी, कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, देशभक्त पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार स्मारकाचा शिलान्यास ( पायाभरणी ) करण्यात येणार आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते शिलान्यास समारंभ निमशिरगाव येथे स्मारकाच्या कार्यस्थळावर दुपारी तीन वाजता आयोजित केला आहे .
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा, द भारतातील २१ संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण,भारतीय संविधान सभेचे सदस्य, ग्रामीण विकास, सहकार, शिक्षण, हरितक्रांती अशा विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठे कार्य केले . त्यांच्या सर्वव्यापी कार्याचे दर्शन घडवणारे स्मारक अद्यापपर्यंत नव्हते . नव्या पिढीपुढे अण्णांच्या कार्याचे समग्र दर्शन घडवण्यासाठी तसेच संविधानविषयक जागरूकता व संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी रत्नाप्पाण्णांचे भव्य स्मारक व संविधान संकुलाची निर्मिती करण्याचा मनोदय स्मारक समितीने केला आहे .
या स्मारकामध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रदर्शन, संविधान दालन ,देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, रत्नाप्पाण्णांच्या जीवन कार्याचे दर्शन, २०० आसन क्षमतेचे सभागृह , लोकशाही प्रशिक्षण केंद्र, युवा प्रशिक्षण केंद्र , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , ग्रंथालय, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र , आरोग्य संवर्धन केंद्र, पुरुष व महिलांचे स्वतंत्र निवास स्थान, व्यायामशाळा, डिजिटल प्रदर्शने , संग्रहालय , विविध दालने व इतर आवश्यक त्या सर्व सुविधा ,असे या स्मारकाचे भव्य स्वरूप आहे .
सध्या स्मारक उभारणीच्या कामाने वेग घेतला असून स्मारकासाठी अडीच एकर जमीन स्मारक समितीकडे हस्तांतरणाचे काम पूर्ण झाले आहे. पर्यावरण रक्षण आणि निसर्गसंवर्धन करण्यासाठी स्मारकाच्या ठिकाणी ५०० हून अधिक भारतीय वृक्ष लावण्यात आलेले आहेत. पाण्याचा सोयीसाठी २३ लाख लिटर क्षमतेच्या शेततळे निर्मिती व बोअरवेल घेण्यात आले आहे . स्मारकाच्या बांधकामाच्या ठिकाणी जमीन सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. स्मारकासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झालेली असून आता या स्मारकाचा शीलान्यास समारंभ जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते रत्नाप्पाण्णांच्या जयंतीदिनी स्मारकाच्या कार्यस्थळावर आयोजित केला आहे.
या समारंभास रत्नाप्पाण्णांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, , हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन स्मारक समितीच्या अध्यक्षा सौ.रजनीताई विश्वनाथ मगदूम यांनी केले आहे.