एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील सुप्त संशोधक वृत्तीला चालना आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांना तांत्रिक व आर्थिक पाठबळ देण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नाॅलाॅजीकल विद्यापीठाकडून ही स्पर्धा भरवली जाते. मानव्यविद्या; भाषा; ललित कला, नैसर्गिक विज्ञान, शेती; पशुपालन, अभियांत्रिकी; तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र अशा सहा विभागातील ५७ प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. पर्जन्यमान, माती परीक्षण, आस्थापना व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, सांगीतिक उपचार अशा विविथ विषयांतील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पातून सादर केली. या अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना समाजातील समस्यांची नाविन्यपूर्ण संकल्पनांनी उकल करत स्टार्टअप सुरू करण्यास चालना मिळेल असे एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. आरिफ इद्रासी, सना मुल्ला, स्नेहा सुतार, अर्पित कांबळे, हेतवी सुतार यांच्या ग्रुपच्या प्रकल्पांना प्रथम क्रमांक तर राजवर्धन जाखले, मैत्रेयी पाटील, समर्थ केसरकर, कृतिका सिंधी, स्नेहा जाधव यांच्या ग्रुपच्या प्रकल्पांना द्वितीय क्रमांक मिळाला. प्रा. महेश घोसाळकर यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी विभागप्रमुख संग्रामसिंह पाटील, प्रा. प्रविण जाधव, डाॅ. विवेक माने आदींनी परिश्रम घेतले.







