Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याश्री महालक्ष्मी अंबाबाईची तिसऱ्या दिवशी श्री. कामाक्षी देवी (कांचीपुरम) स्वरुपातील पूजा

श्री महालक्ष्मी अंबाबाईची तिसऱ्या दिवशी श्री. कामाक्षी देवी (कांचीपुरम) स्वरुपातील पूजा

श्री महालक्ष्मी अंबाबाईची तिसऱ्या दिवशी श्री. कामाक्षी देवी (कांचीपुरम) स्वरुपातील पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री महालक्ष्मी अंबाबाईची तिसऱ्या दिवशी श्री. कामाक्षी देवी (कांचीपुरम) स्वरुपातील पूजा बांधण्यात आली होती.कांचीपुरम (तामिळनाडू) येथील शिवकांची आणि विष्णुकांची या दोन्ही भागांच्या मधोमध श्री कामाक्षीदेवीचे भव्य मंदिर हे शक्तिपीठ फार पुरातन काळापासून उपासनेसाठी प्रसिद्ध आहे.शिवपत्नी सतीचा पिता दक्ष यानं तिच्या पतीचा म्हणजे श्रीशिवांचा अपमान केला म्हणून सतीनं योगाग्नी प्रज्वलित करून देहत्याग केला. तेंव्हा क्रोधायमान झालेले श्री शिव सतीचं अचेतन शरीर खांद्यावर घेऊन भीषण भ्रमण करू लागले. तेव्हा इतर देवांनी भयभीत होऊन श्रीविष्णूंना विनवलं आणि श्रीविष्णूंनी आपलं सुदर्शनचक्र सोडून सतीच्या शरीराचे भाग केले. ते भाग (अवयव) जिथं जिथं पडले तिथं तिथं देवीची शक्तिपीठं निर्माण झाली.
सतीदेवीची नाभी जिथं पडली. तिथं कांचीपुरमचं हे कामाक्षीमंदिर उभारलं आहे. या नाभीस्थानाचं प्रतीक असलेला एक रौप्यस्तंभ मंदिराच्या गाभाऱ्यात आहे. नाभीचं प्रतीक म्हणून या स्तंभाला मधोमध एक छोटंसं छिद्र आहे. आदिशक्ती श्री ललितांविकेने चिदग्नीतून कामाक्षीचा अवतार घेवून श्रीशिवांनी दग्ध केलेल्या कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या राक्षसाचा (भंडासुराचा वध केला. त्यानंतर कामाक्षीदेवी कन्यास्वरूप घेवून कांचीपूरम येथे स्थानापन्न झाली. कांचीची कामाक्षी ही सुईच्या अग्रावर उभी राहून शिवासाठी तपस्या करणारी कुमारिका आहे. असे मानले जाते. (पुढे फाल्गुन मासांत उत्तरा नक्षत्रावर तिचा शिवाशी विवाह झाला.)
भंडासुराच्या वधाच्यावेळी क्रोधायमान झालेल्या तापसी कामाक्षीदेवीचे स्वरूप रौद्र होते. पण आदि शंकराचार्यांनी तिची रौद्र शक्ति तिच्यासमोर श्रीचक्र स्थापून त्यात उतरविली व देवीला शांत केले. त्यांनी सौंदर्यलहरी’ हे स्तुतीपर स्तोत्र देवीसमोर रचले. हे श्रीचक्र आजही या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या पायापाशी आहे. या श्रीचक्राच्या भोवतीने आठ वाग्देवींच्या मूर्ती आहेत.श्री कामाक्षीदेवीची गाभाऱ्यातली मूर्ती ही शांती आणि सौंदर्य यांचा संयोग आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला गायत्रीमंडप असं नाव आहे. श्री कामाक्षीदेवी ब्रह्मासनावर पद्मासन घालून बसलेली आहे. ती चतुर्भुज आहे. खालच्या दोन्ही हातांत इक्षुकोदंड म्हणजे उसाचं धनुष्य (म्हणजे लोकांच्या मनाचे प्रतीक) आणि पाच फुलांचा पुष्पगुच्छ (शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचे प्रतीक) आहे, तर वरच्या दोन हातांत पाश आणि अंकुश ही आयुधे आहेत. देवीच्या उजव्या खांद्यावर एक पोपट (म्हणजे जीवाचे प्रतीक) आहे. असं मानलं जातं की, श्री कामाक्षीदेवीच्या मंदिराच्या गर्भगृहाच्या चार भिंती या चार वेदांचं प्रतीक आहेत, तर गायत्रीमंडपातील चोवीस खांब हे गायत्रीछंदाच्या चोवीस अक्षरांचं प्रतिनिधित्व करतात.
राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ कांचीपुरमला केला होता. भागवतपुराणात बलरामाच्या तीर्थयात्रेच्या कथेत कांचीपुरमचा उल्लेख आहे. दुर्वास ऋषींनीही इथं देवीची उपासना केल्याचा उल्लेख आहे. दुर्वास ऋषी आणि आदि शंकराचार्यांचीही मंदिरं मुख्य मंदिराजवळ आहेत.श्री कामाक्षी देवी कृपाळू आहे, ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते व वाईटाचा नाश करून जगात चांगुलपणाचा अभ्युदय करते. श्री कामाक्षी देवी तुम्हां आम्हां सर्वांना प्रसन्न होवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments