चेतना अपंगमती विकास संस्था व इनरव्हील मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतामधील सर्व इनरव्हील क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोल्हापुरातील सर्व इनरव्हील क्लब (ज्याला इनरव्हील मुव्हमेंटऑफ कोल्हापूर असं संबोधिता येईल) व चेतना अपंगमती विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील अपंगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या एक दिवसीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. छ. संभाजी महाराज क्रीडा संकुल मंगळवार पेठ या ठिकाणी शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उद्घाटनानंतर स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत कोल्हापुरातील बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्य करणाऱ्या ११ शाळा याच मुलांसाठी कार्य करणाऱ्या ७ कार्यशाळा, कर्णबधिर मुलांसाठी कार्य करणाऱ्या ७ विशेष शाळा व अंधांसाठी कार्य करणारी १ अशा एकूण २६ शाळांमधील ४५० च्या आसपास विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक मा. संग्राम पाटील व मा. संदीप पाटील यांच्या माव्र्व्हलस इंजिनियर्स प्रा. ली. यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
इनरव्हील क्लबच्या असोसिएशन प्रेसिडेंट मा. ज्योती महिपाल, कोल्हापूरच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मा. उत्कर्षा पाटील, कन्व्हेनर मा. राधिका शिरगावकर डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअरमन मा. नंदा झाडबुके व चेतना अपंगमती विकास संस्थेचे अध्यक्ष मा. नरेश बगरे यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या स्पर्धेला कोल्हापुरातील सर्व क्रीडाप्रेमीनी उपस्थित राहून या मुलांना प्रोत्साहन द्यावे व त्यांचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात येत आहे..







