बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप चालकांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देणे तात्काळ बंद करावे अन्यथा बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
बाटल्या, कॅन (जे विशेषतः इंधन साठवण्यासाठी प्रमाणित केलेले नाहीत) किंवा तत्सम कोणत्याही असुरक्षित व अप्रमाणित कंटेनरमधून इंधनाची (पेट्रोल/डिझेल) विक्री आणि वितरण करणे हे अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप चालकांनी खालीप्रमाणे दक्षता घ्यावी.
तात्काळ बंदीची अंमलबजावणीः आजपासून, जिल्ह्यातील आपल्या अखत्यारीतील सर्व पेट्रोल/डिझेल पंपांवर बाटलीतून किंवा इतर असुरक्षित कंटेनरमधून इंधन विक्री पूर्णपणे थांबवण्याची तातडीने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विक्री अधिकाऱ्यांची जबाबदारी आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट देऊन, या नियमाचे उल्लंघन होत नाही ना याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघनः नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पेट्रोल पंप चालकास तातडीने कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावावी आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल.जनजागृतीः पेट्रोल पंप चालकांनी पंप परिसरात याबाबत स्पष्ट सूचना प्रदर्शित कराव्यात, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.







