संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश
सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन २०२५–२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम ’ या थीम अंतर्गत पुणे येथील हडपसरच्या अमनोरा स्कूलमध्ये हे विभागीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.
इयत्ता ८ वीतील संस्कृती लांबटे आणि विश्वजीत शिंदे या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी “थर्ड आय” हा अभिनव प्रोटोटाइप सादर केला.‘शाश्वत शेती’ या विषयाअंतर्गत सादर केलेल्या या मॉडेलला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. शेतजमिनीवर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा शोध घेऊन त्यांना मोठ्या आवाजाच्या सिग्नलद्वारे हुसकावून लावणारी ही एआय-आधारित यंत्रणा या विद्यार्थ्यांनी तयार केली होती. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि मीडिया- कम्युनिकेशन व्यावसायिक डॉ. त्रिवेणी गोस्वामी माथुर यांच्या हस्ते झाले. परीक्षक मंडळातही मान्यवरांचा समावेश होता. महाराष्ट्र, गोवा, दीव आणि दमण येथील एकूण १४५ सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनी सात विविध विषयांत आपली मॉडेल्स सादर केली.
शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंधारण, उदयोन्मुख तंत्रज्ञान,हरित ऊर्जा या विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागाच्या विद्यार्थ्यांच्या या
उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
या विद्यार्थ्यांना श्री संतोष हिरेमठ व सौ. साक्षी चौगुले यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. नवीन महाबळेश्वर, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल कौतुक केले.







