कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावर साकारली एलईडी दिव्यांची भव्य रांगोळी
कोल्हापूर/प्रतिनिधी : अयोध्या नगरीत आज रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक दिनानिमित्त कोल्हापुरात आनंद उत्सव साजरा झाला. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी तर्फे, कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावर, एक अनोखा आणि वेगळा उपक्रम पार पडला.
कोल्हापुरात पहिल्यांदाच सुमारे १५० फूट बाय १५० फूट इतक्या भव्य आकाराची, एल इ डी दिव्यांची रांगोळी साकारण्यात आली. त्यातून श्रीराम मंदिराची भव्य अशी प्रतिमा मैदानावर उमटली. तेजस्वी दिव्यांनी साकारलेल्या मंदिराची प्रतिमा पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करत होती. तसेच रुईकर कॉलनी मैदानावर भव्य आतषबाजी करण्यात आली. दरम्यान प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायण कार्यक्रमाचे एल ई डी वॉल वर प्रक्षेपण करण्यात आले. या उपक्रमाला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली.संपूर्ण कोल्हापूर राम मय झालेलं आहे. एलईडी दिव्यातून साकारलेली ही आधुनिक काळातील रंगवली कलात्मकता आणि भक्ती भाव यांचा सुरेख संगम आहे, अशी भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. यावेळी चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.






