कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधल्यानेच शिवसेनेत उठाव घडला – पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर
कोल्हापुरात शिवसेनेचा हिंदूगर्वगर्जना संपर्क मेळावा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. प्रंसगी गुन्हे अंगावर घेवून आयुष्यभर कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला विरोध केला पण, तीच शिवसेना कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या विचारांवर चालू लागली आणि कडवट शिवसैनिकांना पदोपदी होणारा अवमान सहन न झाल्यानेच शिवसेनेत उठाव झाला. या उठावाचे सूत्रधार मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंनद दिघे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत असून, टीकेला उत्तर न देता महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून शिवसेना काम करत आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्याची उन्नती आणि सर्वांगीण विकास हेच धोरण शिवसेनेचं असून, त्यास मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे समस्त शिवसैनिकांच्या साथीने समर्थ असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांनी केले. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह येथे शिवसेनेचा हिंदूगर्वगर्जना मेळावा आज पार पडला. याप्रसंगी त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याच्या सुरवातीस युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेना व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांचा चांदीची तलवार व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भगव्या खोक्यातुन शिवसेनेच्या मफलर काढून शिवसैनिकांना वाटप करीत, खोक्यावरून होणाऱ्या बदनामी कारक वक्तव्यांना उत्तर देण्यात आले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेनेस इतिहास आहे. ६ मे १९८६ च्या शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून रात्रंदिवस काम करून शिवसेना वाढविली. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीतून जनतेला न्याय देणाचे काम केले. शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती कि कॉंग्रेस – राष्ट्रवादी शी कदापि युती नाही परंतु कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी युतीची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतल्याने अनेक कडवट शिवसैनिकांमध्ये घुसमट होती. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची शिवसेनेची वाताहत होत असताना मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परिवर्तनाची लाट आणली आणि राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि कडवट शिवसैनिकांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा दिला. गेले चार महिने कोल्हापुरात एककलमी कार्यक्रम सुरु आहे. कोणीही येत आणि प्रसिद्धीसाठी राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करत. खासदार विनायक राऊत यांनीही खालच्या पातळीवर जावून टीका केली. त्यास मी उत्तर दिले नाही. पण, सत्य कधी लपून रहात नाही माझ्यावर झालेल्या टीकेस तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनीच खोडून काढत राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या उठावानंतर कोल्हापुरात काही स्वयंघोषित शिवसैनिक बदनामी करत आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या संजय पवार यांनी कधीच शिवसेना वाढीच काम केले नाही. प्रत्येक निवडणुकीत धनुष्यबाणाच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे शिवसेनेबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मातोश्रीचा आदेश पाळून मी पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार केला त्यांना निवडून आणल पण त्याच बक्षीस गद्दार संजय पवार यांना राज्य सभेची उमेदवारी देवून केले. पण जैसी करणी वैसी भरणी प्रमाणे पुरेस संख्याबळ असूनही संजय पवार यांचा पराभव झाला, हे शिवसेनाप्रमुख बघत आहेत. सन २०१४ ते १९ च्या दरम्यान तीन वेळा मंत्री मंडळाचा विस्तार झाला प्रत्येक वेळी प्रसिद्धी माध्यमात माझे नाव अग्रभागी असताना पक्ष नेतृत्वाने संधी दिली नाही. पण, निवडणूक हरल्यानंतरही मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी शहर विकास कामांना निधी देवून कार्यरत राहण्याच पाठबळ दिले. त्यामुळे नेतृत्व कस असाव हे शिंदे साहेबांनी दाखवून दिले आहे. गेल्या ४ महिन्यात काहींनी जंगजंग पछाडले आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त शिवसैनिक हे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्याच पाठीशी ठाम उभे आहे. २०१९ व २१ च्या महापुरात कोणत्याही नेत्याने कोल्हापूरकडे लक्ष दिले नाही पण मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी प्रापंचिक साहित्यासह अन्न धान्याची मदत पाठवून नागरिकांना दिलासा दिला. कोव्हीड काळातही त्यांनी मदत केली. २०१९ च्या महापुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकली असताना पहाटे पाच मी फोन करून मदत करण्याची विनंती केली. तेंव्हा एन.डी.आर.एफ. च्या टीम सोबत जावून त्यांनी स्वत: बचाव कार्य करून नागरिकांना बाहेर काढले. अशा अनेक कामांमुळे शिवसैनिकांना बळ देण्याचे काम मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी केले असून, आगामी काळात शिवसेनेस जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासही त्यांचे पाठबळ मिळत आहे, असे सांगत जिल्ह्यातील खंडपीठ, हद्दवाढ आदी ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री महोदयांशी बोलून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री नाम.दीपक केसरकर यांना केले.
यानंतर बोलताना पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्र राज्याला मिळाली. चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना महारष्ट्रातील मराठी माणसाच्या न्यायासाठी अर्पण केले. मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या दावणीला बांधणे. शिवसेनाप्रमुखांनी केलेली हिंदुत्वाची युती तोडणे हे शिवसैनिकांच्या मनाला खटकत होते. कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी झालेली युती अनैसर्गिक होती, शिवसैनिकांच्या मनाला न पटणारी होती. कारण शिवसेनाप्रमुखांनी कधीच हिंदुत्व सोडल नाही. तर त्यांच्याच विचारांनी घडलेल्या शिवसैनिकांनी प्रसंगी आमदारकी पणाला लावून शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवला. आम्ही आजही हिंदुत्ववादी आहोत तर मग इतर हिंदुत्ववादी पक्षांशी फारकत का घ्यावी? शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री होणार म्हणून शिवसैनिकांनी मनातील खेद बाजूला ठेवून आघाडी करण्याचा आदेश स्वीकारला. पण कॉंग्रेस – राष्ट्रवादी कडून शिवसेना संपविण्याचा होत असणारा प्रयत्न न पटल्यानेच मुख्यमंत्री नाम.शिंदे साहेबांनी उठाव केला व त्यास सर्व लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी साथ दिली. आगामी काळात शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचाराने आणि विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य मार्गक्रमण करेल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेतेऋतुराज क्षीरसागर, युवा सेना जिल्हा अधिकारी चेतन शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर आणि आभारप्रदर्शन उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी केले.
या मेळाव्यास खासदार धैर्यशील माने, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य किरण साळी, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, अशोक शिंदे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, तालुकाप्रमुख संजय संकपाळ, बिंदू मोरे, प्रकाश सूर्यवंशी, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पुजाताई भोर, पवित्रा रांगणेकर, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, अमोल भास्कर आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.