शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेकडून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन
कृतज्ञता पर्वानिमित्त समाधीस्थळास भेट देऊन वाहिली आदरांजली
कोल्हापूर/प्रतिनिधी : दि. ३० एप्रिल: राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राजर्षी शाहू समाधीस्थळी भेट देऊन महाराजांच्या पवित्र स्मृतींना मनोभावे अभिवादन केले. या प्रसंगी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती या प्रमुख उपस्थित होत्या.
शिवाजी विद्यापीठात आज व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने एकत्र आलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने समाधीस्थळास भेट देऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचे ठरविले. त्यानुसार सायंकाळी बैठक संपल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी समाधीस्थळास भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती याही उपस्थित होत्या. त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्वच सदस्यांसमवेत शिवाजी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा केली. विशेषतः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठ राबवित असलेल्या उपक्रमांबाबत जाणून घेतले. डॉ. भारती पाटील यांनी त्यांना या कार्यक्रमांबाबत माहिती दिली.
यावेळी व्यवस्थापन परिषदेचे कुलपती नियुक्त सदस्य अमित कुलकर्णी यांच्यासह श्री. जी.आर. पळसे, डॉ. आर.के. कामत, अॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आर.जी. कोरबू, डॉ. योजना यादव, डॉ. प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.