राज्यात आम्ही महाविकास आघाडीसोबतच परंतु आम्ही आमचा वापर कधीही होऊ देणार नाही – खासदार संजय मंडलिक
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँकेची २०२१-२६ करीता पंचवार्षिक निवडणूक लागली आहे.ही निवडणूक ५ जानेवारी रोजी होत आहे.या पंचवार्षिक निवडणूककरीत शिवसेना,शेकाप,आरपीआय व मित्रपक्ष पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी जाहीर करण्यात आली आहे. आम्ही शिवसेनेसाठी एक जागा मागत होतो परंतु तेही देणे त्यांना अवघड वाटत आहे. आम्ही आमचा सतत वापर होऊ देणार नाही. राज्यामध्ये महाविकासआघाडी एकत्रित काम करत आहे. आम्हीदेखील महाविकास आघाडी बरोबरच आहे. वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करू परंतु जर आपला वापर होत आहे असे आढळले तर तेही आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू असे खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आज ही जाहीर पत्रकार परिषद घेण्यात आली.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतरच राजकारण सुरू झाले. आम्ही हवेत टोप्या फेकल्या. ज्याला बसतील, त्याला बसतील असेही त्यांनी मिश्कील विधान केले. गोकुळमध्ये एकत्र लढलो. पण जिल्हा बँकेमध्ये एका जागेसाठी त्यांनी नकार दिला. आणि निवडणुकींना सामोरे जावे लागले. वापरा आणि फेका ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. तुम्हालाही आम्ही भरभरून दिले आहे. जिल्हा बँकेत आमचा विचार का केला नाही? असा सवाल माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकारी आधीच पत्रकार परिषद घेऊन तालुकानिहाय किती मतदान होणार हे जाहीर करतात. याचा अर्थ विरोधकांना निवडून न येण्याची भीती बसली आहे. निवडणुकीत ही प्रक्रिया लोकशाही मार्गानेच झाली पाहिजे, असा आग्रह आमदार प्रकाश आबिटकर यांनी धरला. पत्रकार परिषदेस अजित नरके, शहाजी कांबळे, सुरेश कोरडे,संजय पवार, सुनील मोदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.