काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच जिल्हा बँकेची निवडणूकएक जागा शिवसेनेला दिली असती तर काय बिघडले असते? – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत कोणाचे तरी ऐकूण काँग्रेस-राष्ट्रवादीने डावलल्यामुळेच शिवसेनेला स्वतंत्रपणे मैदानात उतरावे लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसोबत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुूकीत गोकुळ प्रमाणेच महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टीने चर्चाही सुरू होती. जिल्हा बँकेत सध्या खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी खासदार निवेदीता माने हे दोन विद्यमान संचालक आहेत. त्या वगळता आम्ही आणखी एक जादा जागा मागत होतो. गटाबाबत आमचा कोणताही आग्रह नव्हता. कोणत्याही गटातील द्या, पण शिवसेनेला आणखी एक जादा जागा हवी होती. तसा प्रस्तावही आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दिला होता. नेहमीप्रमाणे त्यावर चर्चेचे गुर्हाळ झाले. माघारीच्या दिवशी अपेक्षित निर्णय घेतील म्हणून शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. परंतू राजकारणात विश्वासघाताची परंपरा असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघारीची मुदत संपण्याआधी काहीकाळ शिवसेनेला जागा देण्यास नकार दिला. वेळ कमी होता, त्यामुळे शिवसेनेचे पॅनेल होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतू शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम. श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख मा. अरुणभाई दूधवडकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकवटले आणि पुढाकार घेऊन पॅनेलसाठी सूत्रे हलविली.
शिवसेनेला जिल्हा बँकेच्या निवडणूकीत तगडे उमेदवार मिळणार नाहीत, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना वाटत होते. मात्र त्यांच्या अपेक्षांना सुरूंग लावत शिवसेनेने पॅनेल तर केलेच, त्याबरोबरच पॅनेलमधून तुल्यबळ उमेदवारही दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने जर सुरूवातीलाच एक जागा देण्यास नकार दिला असता तर तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातील बारा उमेदवारही निवडणूकीत उतरवले असते. जिल्ह्यात आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा… अशा अविर्भावात वागणार्या मंडळींना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे. सहकारात राजकारण आणू नये असे ही मंडळी सतत म्हणत असतात. परंतू स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतील हे त्यांनी भाजपसोबत आघाडी करून दाखवून दिले आहे. राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सभासदांनी शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडूण द्यावे. जिल्हा बँक शिवसेनेच्या ताब्यात आल्यास बॅंकेची सर्वांगिण आर्थिक प्रगती होईल, असे प्रतिपादनही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.