कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय)- प्रभाग समिती, ग्राम समिती पुन्हा एकदा सक्रीय करुन प्रभावी काँटॅक्ट ट्रेसिंगचे काम करा. आशा, शिक्षक, पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभागनिहाय, गावनिहाय सर्व्हेक्षण करावे. नागरिकांनीही लवकर उपचार सुरु करण्याच्यादृष्टीने आपली लक्षणं लपवू नयेत. सर्व्हेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी आज संपर्क साधला. कोव्हीड-१९ बाबत सद्यस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, संसर्ग रोखण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. तलाठी, ग्रामसेवक यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. एका रुग्णामागे १५ ते २० ट्रेसिंग झाले पाहिजे. मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढवा. इली, सारीच्या रुग्णांचीही माहिती मिळवा. खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय दुकानदार यांचा व्हाटस ॲप ग्रुप तयार करुन या ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांची माहिती आणि पुढील कार्यवाहीचे नियोजन करा. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे आदीबाबत जनजागृती करा. अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. गावांसाठी नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांना सक्रीय करा. सर्व्हेक्षण आणि ट्रेसिंग चे काम प्रभावीपणे होते का याचीही तपासणी करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. लोकांनी लोकांसाठी केलेले सर्व्हेक्षण – प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सर्वेक्षणही व्हायला हवे. प्रभागनिहाय, गावनिहाय सर्वेक्षण करतान नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संस्थ, सार्वजनिक मंडळे यांचाही सहभाग घेवून लोकांनी लोकांसाठी केलेले सर्व्हेक्षण व्हायला हवे. १५ दिवसात चांगले चित्र दिसेल. मृत्यूदरही कमी राखण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, बावड्यासारख्या ठिकाणाहूनही स्वॅब घेण्यास प्रारंभ केल आहे. ग्रामीण आणि शहरी अशा भागात समन्वयाने काँटॅक्ट ट्रेसिंग आणि सर्वेक्षणाचे काम करा. शहरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी असाणारे सामाजिक कार्यकर्ते, संस्था हे देखील या सर्व्हेक्षणात योगदान देणार आहेत. त्यांचीही मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी करावी. गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास ५ हजाराचा दंड लागू केल आहे. विना मास्क दिसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा. अर्ली डिटेक्शन फार महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीही सर्वेक्षणावर भर देवून, तो होतो का याची तपासणी करा अशी सूचना केली. डॉ. अनिता सैबण्णावर यांनी यावेळी उपचार प्रोटोकॉलविषयी तर डॉ. उषादेवी कुंभार यांनी पोर्टल अपडेशनविषयी सूचना केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पीपाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.