डॉ. अरूण निगवेकर यांच्या निधनामुळे द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्येष्ठ पदार्थवैज्ञानिक डॉ. अरूण निगवेकर यांच्या निधनामुळे भारताला लाभलेला द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. अरूण निगवेकर यांनी पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून भरीव कामगिरी केलीच, पण त्याचबरोबर देशाच्या शैक्षणिक क्षेत्रासही अतुलनीय स्वरुपाचे योगदान दिले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. देशाच्या विविध शैक्षणिक समित्यांवर काम करून धोरणात्मक दिशा देण्याचे काम त्यांनी केले. बेंगलोर येथील ‘नॅक’च्या पायाभरणीत व उभारणीत त्यांचे अतुलनीय योगदान राहिले. ते नॅकचे पहिले संस्थापक अध्यक्ष होते. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांचा ‘भारताच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे जनक’अशा शब्दांत गौरव केलेला होता. डॉ. निगवेकर यांचे कोल्हापूरशी तसेच शिवाजी विद्यापीठाशी अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. येथील राजाराम महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते. सन २००३मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ३९व्या दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिले होते. त्यांच्या निधनामुळे भारताच्या शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी म्हटले आहे.