कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये मुदत संपलेल्या सलाईनचा रुग्णासाठी वापर
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अक्षम्य हलगर्जीपणावरून आता सीपीआर रुग्णालयाच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, पेठ वडगावमधील ७५ वर्षीय महादेव खंदारे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना मुदत संपलेले सलाईन दिल्याची बाब त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आणली यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हे सलाईन दाखविले. यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उलट आपला रुग्ण दगावला का? असा प्रतिप्रश्न केला. यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे याची लेखी तक्रार केली. दरम्यान, या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सीपीआर रुग्णालयाबाबत लोकांच्या मनात उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
सर्वसामान्यांसाठी अत्यंत कमी खर्चामध्ये उपचार केले जाणारे रूग्णालय म्हणून रुग्णालयाची ओळख आहे आर्थिक परिस्थिती नसलेले रुग्ण याठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात मात्र त्यांना जर असे उपचार या ठिकाणी केले जात असतील तर सीपीआर च्या कारभाराबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.