बुलडाणा अर्बनच्या स्वर्गरथाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण
गडहिंग्लज/प्रतिनिधी : बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शववाहिका म्हणजेच स्वर्गरथाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. अद्ययावत व सुसज्ज वाहनावर आधारित ही शववाहिका गडहीग्लजकरांच्या सेवेत दाखल झाली. बुलढाणा अर्बन व विजयकुमार राजाराम शहा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय लीलावती राजाराम तुकाराम शहा यांच्या स्मरणार्थ हा स्वर्गरथ लोकार्पण केला आहे.यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ग्राहकसेवा आणि विश्वासार्हतेच्या जोरावर बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने देशात एक नंबरचे स्थान मिळविले आहे. सहकारातील बँकिंग बरोबरच या समूहाने जपलेली सामाजिक बांधिलकीही गौरवास्पद आहे.
बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे म्हणाले, बँका, साखर कारखाने आणि पतसंस्था एवढ्यापुरताच सहकार शिल्लक राहिला आहे. ही व्यवस्था टिकली नाही तर पुन्हा खाजगी सावकारीचे स्तोम माजेल. या ग्रुपने बँकिंग व्यवसायाबरोबरच स्थानिक गरजा व सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले आहे.
नगराध्यक्ष सौ स्वाती कोरी म्हणाल्या, बुलडाणा अर्बन परिवाराच्या दातृत्वातूनच हा उपक्रम साकारला आहे. उद्योजक पार्थ शहा म्हणाले, गडहिंग्लज शहराने आम्हाला भरपूर दिले आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतूनच आम्ही या शहरासाठी आमच्या परीने काहीतरी करणं ही आमची जबाबदारी आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण कदम, माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, उद्योजक हेमंत शहा, श्यामसुंदर मर्दा, राजाराम शहा, विजयकुमार शहा आदी प्रमुख उपस्थित होते.