आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि कोल्हापूरच्या महापालिकेच्या व अन्य उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे,या उर्दू कार्निवलचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ आहेत.अशी माहिती उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजक गणी आजरेकर, कादरभाई मलबारी अबू ताकीलदार रफिक शेख बापू मुल्ला,रहीम महात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दसरा चौक येथील मैदानावर आयोजित या कार्निवलमध्ये कोल्हापूर शहरातील मुस्लिम बोर्डिंग संचलित नेहरू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,अँग्लो उर्दू हायस्कूल,शिरोली, कोमनपा डॉ.झाकिर हुसेन उर्दू मराठी शाळा सुसरबाग कोल्हापूर,हाजी शाबाजखान आमीनखान जमादार उर्दू मराठी शाळा,जवाहर नगर कोल्हापूर,हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी शाळा विक्रमनगर,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु हायस्कूल जवाहर नगर कोल्हापूर या शाळांचा समावेश आहे,
उर्दु कार्निवलमध्ये ऊर्दू मराठी इंग्रजी भाषेचा इतिहास,ऊर्दू मुशायरा, ऊर्दू भाषेतील वाडमय मधील विविध प्रकाराचे सादरीकरण,स्नेहसंमेलन अंतर्गत देश भक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.त्याचबरोबर या कार्निवल मध्ये आयोजित प्रदर्शनात सर्वात छोट्या पवित्र कुराणाची प्रत,राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत भाषांतरीत करून घेतलेल्या पवित्र कुराणाची प्रत,इसवी सन पूर्व नाण्यांचे प्रदर्शन आणि फूड फेस्टिव्हल सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.तरी कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ऊर्दू भाषेतील जाणकारांनी व उर्दु भाषेच्या अभ्यासकानी व समस्त कोल्हापूरकरांनी या ऊर्दू कार्निवलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक गणी आजरेकर व आयोजकांनी केले आहे.