ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला ग्रामपंचायतीसाठी केले मतदान
कागल/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला या गावात जाऊन दुपारी साडेतीन वाजता ग्रामपंचायतीसाठी मतदान केले. वास्तविक, कालच म्हणजेच गुरुवारीच मंत्री मुश्रीफ कोल्हापूरला पोहोचणार होते. परंतु; पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना मुंबईतच थांबावे लागले. त्यामुळे, आज शुक्रवारी सकाळीच खास मतदानासाठी मुंबईवरून चारचाकीने निघालेल्या श्री. मुश्रीफ यांनी दुपारी लिंगनूर या गावात पोहोचत मतदानाचा हक्क बजावला.याबाबत अधिक माहिती अशी, येथील श्री. हनुमान चौकातील स्वमालकीच्या घरातून ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या मतदानाची नोंद आहे. गेल्या तीस वर्षांपासून मंत्री मुश्रीफ यांची या घरातून मतदान नोंद आहे. लिंगनूर दुमाला ग्रामपंचायतसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गट, खासदार संजय मंडलिक गट व माजी आमदार संजय घाटगे गट अशी संयुक्त जय हनुमान ग्रामविकास आघाडी आहे. तर विरोधात भाजपचे पॅनेल आहे.यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,कोणत्याही निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असतात. त्यामुळे निकोप पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी जास्तीत जास्त किंबहुना सर्वच मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे अत्यावश्यक आहे.
चौकट……..
गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमचे नेते शरद पवारसाहेब यांनी आम्हा कार्यकर्त्यांकडून नेहमीच ही अपेक्षा धरली आहे, की अशा निवडणुकांच्या माध्यमातून धडपडणारे तळमळीचे कार्यकर्ते पुढे येऊन नेतृत्व तयार झाले पाहिजे. या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य, गोरगरिबांची सेवा घडावी, हाच त्यांचा आम्हा सर्वांना संदेश आहे.