युनिफाईड बॅायलॅाज मंजूर झालेबद्दल क्रिडाईकडून खासदार मंडलिक यांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर क्रिडाईच्या विनंतीस मान देवून तब्बल पावणे दोन वर्षे अडकलेल्या नवीन एकसमान बांधकाम नियमावलीं (युनिफाईड बायलॅाज) च्या मसूद्याला मान्यता मिळावी याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी नगरविकास मंत्री नाम.एकनाथ शिंदे यांना ठाणे येथे क्रिडाईच्या शिष्टमंडळासमवेत भेटून केलेल्या आग्रही मागणीनुसार या नियमावलीस मंजूरी देण्याचा क्रांतीकारी निर्णय नाम.एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने आजरोजी क्रिडाई कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने खासदार संजय मंडलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांचा सत्कार केला याप्रसंगी क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रविकिरण माने, गौतम परमार, प्रदीप भारमल, शिवाजी संकपाळ, श्रेयश मगदूम, सागर नालंग, राजेश आडके, पवन जमादार, विश्वजीत जाधव, आयोध्या डेव्हलपर्सचे नितीन पाटील, ॲड. सुरेश कुराडे, रमण राठोड आदी उपस्थित होते.
दरम्यान ठाणे येथे नाम. एकनाथ शिंदे यांचेशी झालेल्या चर्चेनुसार युनिफाईड बॅायलॅाजच्या अंमलबजावणीस हिरवा कंदिल दाखवला होता व त्याबाबतच्या मसुद्याला काल (दि. 04) रोजी मान्यता देवून याबाबतच्या नियमावलीचे आदेश राज्यशासनाकडून पारीत करण्यात आल्याने मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील दहा हजार बांधकाम प्रकल्पांचा नारळ फोडण्याचा मार्ग आता यामुळे मोकळा झाला आहे. सरकारच्या या निर्णयाने बांधकाम व्यवसायाला उर्जितावस्था मिळणार आहे. राज्यात प्रत्येक नगरपालिका व महापालिकेतील बांधकाम नियम वेगळे होते. यातही अनेक त्रुटी होत्या. यामुळे बांधकाम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी अशी मागणी होत होती. एकसमान बांधकाम नियमावलीलागू करण्याबाबत आलेल्या हरकती व सूचना विचारात घेत संबंधित नियमावली तातडीने लागू होईल या प्रतिक्षेत राज्यातील बांधकाम व्यावसायिक होते.
या नव्या नियमावलीचा फायदा मुंबई वगळता पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे यासह सर्व महापालिका क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांना होणार असल्याने बांधकामांना गती येणार असल्याने बांधकाम व्यावसायीकात समाधानाचे वातावरण आहे.