शहरात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहिम सुरु
कोल्हापूर/प्रतिनिधी : क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण यांची संयुक्त रुग्ण शोध मोहिम शहरात सुरु करण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ आज नागरी आरोग्य केंद्र क्रमांक ०३ राजारामपुरी येथे उपायुक्त निखिल मोरे यांच्याहस्ते व आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी सर्वेक्षणामध्ये प्रत्यक्ष गृह भेटी देऊन नागरिकांना मोहिमेसंबंधी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यातील कोविड-१९ आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांना निदान व औषधोपचाराखाली आणण्याच्या प्रमाणावर बराच परिणाम झाला आहे. या विषयी शासन मार्गदर्शक सुचनेनुसार महानगरपालिका, क्षयरोग विभाग यांचेकडून रुग्णांना लवकर निदान आणि औषधोपचाराखाली आणणेसाठी शहरामध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनाखाली क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण यांची संयुक्त रुग्ण शोध मोहिम दि.०२ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविण्यात येत आहे.
मोहिमे अंतर्गत शहरातील ३० टक्के लोकांची तपासणी करणेत येणार आहे. त्यानुषंगाने १६८३८८ इतके लोकसंख्या उद्दिष्ट निश्चित करणेत आले असून, आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांचे ११८ पथके तयार करणेत आलेली आहेत. सदर पथकांचे सनियंत्रण नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. मोहिमे अंतर्गत संशयित क्षयरुग्णांसाठी मोफत क्ष-किरण तपासणीची सुविधा सावित्रीबाई फुले रुग्णालय, को.म.न.पा. येथे उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.
कोविड-१९ परिस्थितीमध्ये जनतेने घाबरुण न जाता क्षयरोग किंवा कुष्ठरोगाची लक्षणे असल्यास घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना आपल्या आरोग्या विषयी अचुक माहिती देऊन मोफत तपासणी करुन घ्यावी. तपासणी अंती क्षयरोगाचे निदान झालेस पुढील तपासणी उदा. एक्स-रे, सीबीनॅट व इतर आवश्यक तपासण्या आणि औषधोपचार संपुर्णपणे मोफत पुरविणेत येत आहे. तरी नागरीकांनी सहाकार्य करुन क्षयरोग मुक्त कोल्हापूर मोहिम यशस्वी करणेचे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले.
या प्रसंगी प्रशासन वैद्यकीय अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र फाळके, डॉ.शोभा दाभाडे, आरोग्य पर्यवेक्षक नागपुरकर व क्षयरोग व कुष्ठरोग विभागाकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.