कल्याणीताई आम्ही लाखो भाऊ तुझ्या पाठीशी आहोत…शहीद ‘ऋषिकेश’च्या बहिणीला नविद मुश्रीफ यांचा दिलासा
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दिला तीन लाखांचा धनादेश
कोल्हापूर/उत्तूर/प्रतिनिधी : कल्याणीताई, ऐन भाऊबीजेदिवशी ज्या भावाला ओवाळून त्याचे आशीर्वाद घ्यायचे त्याच भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले, या वेदनेला परिसीमाच नाही. ताई…… तुझ्या भावाने देशासाठी दिलेले बलिदान स्मरणात ठेऊन आम्ही लाखो भाऊ तुझ्या पाठीशी उभे आहोत, असे भावपूर्ण उदगार सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी काढले.
नवीद मुश्रीफ यांनी बहिरेवाडी ता. आजरा, जिल्हा- कोल्हापूर येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेटून कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी श्री. मुश्रीफ यांनी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने जोंधळे कुटुंबियांना तीन लाख रुपये अर्थसहाय्यचा धनादेश दिला.
शहीद जवान ऋषिकेश यांची बहीण कु. कल्याणी, वीरपिता श्री. रामचंद्र, वीरमाता सौ. कविता यांच्यासह कुटुंबियांचे श्री. मुश्रीफ यांनी सांत्वन केले.
यावेळी विधानसभा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वसंतराव धुरे, आजरा साखर कारखान्याचे संचालक मारुतीराव घोरपडे, पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई, माजी उपसभापती दीपक देसाई, सरपंच अनिल चव्हाण, इंदुमती महिला दूध संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गोरूले, उपसरपंच सुरेश खोत, विजय गुरव, मिलिंद कोळेकर, सुधीर सावंत, सुरेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट………
व्यर्थ न हो बलिदान……..
यावेळी अंतरात्म्यातून आलेल्या हुंदक्याच्या गर्दीतच वीरपिता रामचंद्र व वीरमाता सौ. कविता म्हणाले, एकुलता एक वंशाचा दिवा असलेला आमचा ऋषिकेश या जगातून निघून गेला, याचे अतीव दुःख आहेच. दरम्यान; भारतमातेच्या रक्षणासाठी त्याने हौतात्म्य पत्करल्याचा अभिमानही आहे. आमच्या मुलासारख्या हजारो शहिदांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.