Thursday, May 8, 2025
spot_img
Home Blog Page 3

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २६ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन

0

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २६ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी :आर. एल. तावडे फाउंडेशनचे, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि ‘अ‍ॅसोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया’ (APTI) महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने इमर्जिंग ट्रेंड्स इन ड्रग डिस्कव्हरी अँड ट्रान्सलेशनल रिसर्च या विषयावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील परिषद दिनांक २६ एप्रिल २०२५, रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदचे विषय नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टिम, रेग्युलेटरी अफेअर्स, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ई. आहेत. या परिषदेमध्ये विविध राज्यातल्या महाविद्यालयातुन सुमारे ४१५ बी. फार्म, एम. फार्म, विध्यार्थी, प्राध्यापक तसेच पी.एच.डी रिसर्च स्कॉलर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शोध निबंध व पोस्टर प्रेज़ेंटेशन करणार आहेत. स्पर्धकांचे ऑनलाईन व ऑफलाईन विभागणीनुसार मूल्यांकन करण्यात येणार आहे.विजेते आणि उपविजेते यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत.
या परिषदेसाठी मा. कुलगुरू श्री. डी. टी. शिर्के व मा. प्र.कुलगुरु पी. एस. पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा.कुलसचिव, प्रो. डॉ. एम. एस. गणचारी, के. एल. ई विद्यापीठ बेळगाव, डॉ. हर्षा हेगडे शास्त्रज्ञ आय सी एम आर, बेळगाव व श्री. रवींद्र पुरोहित संचालक आर. एन. फार्मा कनसल्टिंग पुणे, संभोधित करतील.
ही परिषद संस्थेचे सचिव श्रीमती शोभा तावडे व सहसचिव श्री. सुजय तावडे, यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली व संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, प्राचार्य डॉ. राजकुमार बगली, व परिषदेचे सचिव डॉ. आदित्य अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परीश्रमामुळे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.

ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दाखल,आयर्नविन ख्रिश्चन मैदान येथे शुक्रवारपासून होणार सर्कसला प्रारंभ

0

ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दाखल,आयर्नविन ख्रिश्चन मैदान येथे शुक्रवारपासून होणार सर्कसला प्रारंभ

कोल्हापूर /प्रतिनिधी : ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. येथील आयर्नविन ख्रिश्चन मैदान ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे.एअर कुलसह तब्बल १५ वर्षानंतर आर्यन ख्रिश्चन हायस्कूल मैदान इथे ही सर्कस दाखल झाली आहे.
शुक्रवार २५ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता या सर्कसचा पहिला शो सादर केला जाणार आहे.तर यानंतर
दररोज दुपारी दीड सायंकाळी साडेचार आणि साडेसात वाजता असे दररोज तीन शो सादर केले जाणार आहेत. करवीरवासीयांनी तब्बल पंधरा वर्षानंतर कोल्हापुरात दाखल झालेल्या बॉम्बे सर्कसचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आर.एम.पिल्लई,पप्पल जी,जितेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांसाठी
शुक्रवार २५ एप्रिल पासून मनोरंजनाचा खजिना घेऊन आली आहे.आर्यन ख्रिश्चन हायस्कूल मैदान इथे दाखल झालेल्या या सर्कसमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश आहे. अफ्रिकन, मणिपुर, नेपाली, रशियन, इथोपियन, बंगाली, आसाम आणि आंतरराष्ट्रीय कलाकार चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. कोल्हापूरकरांसाठी उन्हाळा सुट्टी मनोरंजनाची मेजवानी म्हणून ग्रेट बॉम्बे सर्कसचे कलाकार आपल्या चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. ग्रेट बॉम्बे सर्कस जगातील सर्वात जुनी आणि नावाजलेली असून या सर्कसची स्थापना १९२० साली झाली आहे.बॉम्बे सर्कसचे फिर हेराफेरी, धूम, क्रिश, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर, शिकारी, सावधान इंडिया एपिसोड, अमिताभ बच्चनची इन्सानियत, खेल खिलाडी का, तेरी मेहरबानीयाँ अशा विविध चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.सर्कसमध्ये एकूण ४०० कलाकार आणि कर्मचा-यांचा समावेश आहे. ही सर्कस अनेक राज्यात जाऊन आपलं सादरीकरण करून आली आहे.नेपालियन, बंगाली, मणिपूर अशा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा ७० फुट उंचीवरील हवेतील कॅचींग झोका, इथोपियन कलाकारांचा बांबू डान्स, फुट जगलिंग, एका डोक्यावरती १० टोप्या फिरविण्याच्या कलाकृती, कोडोलिझा, योकेनिन गेम, पोल बॅलन्सींग, ७ फुट उंच असलेला आणि ७० किलो वजन असलेला अफ्रिकन आर्टिस्ट, अवघ्या एक फुटाच्या सायकलवरती कलाकृती दाखवून डोळयाचे पारणे फेडणारा, सायकल बॅलन्सींग एका मोठया कुव्यामध्ये, ७ मोटारसायकलींग बाईकचा समावेश असलेला कारनामा, २० फुट उंचीवर हवेतील जंपींग, जोकरचे पोट धरुन हसविणारे विविध धमाली विनोद, लिंबू डान्स, रशियन मुलींचा ब्रेकडान्स, फायर डान्स, व्हील ऑफ डेथ असे अनेक प्रकारचे आकर्षक खेळ येथे पाहायला मिळणार आहेत.
तरी कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांनी या सर्कसचा लाभ घ्यावा असे आवाहन बॉम्बे सर्कसचे
व्यवस्थापक आर.एम.पिल्लई
पप्पल जी,जितेंद्र सिंग यांनी केले आहे.

समर्पित जीवनाचा सन्मान आवाडे दादांना ‘संस्काररत्न पुरस्कार’ प्रदान

0

समर्पित जीवनाचा सन्मान आवाडे दादांना ‘संस्काररत्न पुरस्कार’ प्रदान

इचलकरंजी/प्रतिनिधी : दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंग, इचलकरंजी येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संस्काररत्न पुरस्कार आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी अक्षय हजारे यांनी तयार केलेली आवाडे दादांच्या जीवनपटावरील डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली,मानपत्राचे वाचन तीर्थकर माणगावे सर यांनी केले.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आपल्या कर्तृत्वाने सहकार, राजकारण, शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवा या विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आवाडे यांनी इचलकरंजी नगराध्यक्षापासून राज्य मंत्री, खासदार आणि जागतिक पातळीवरील संघटनांमध्ये नेतृत्व केले आहे.
जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते लोकमान्य झाले. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, डीकेटीई शिक्षण संस्था, विविध सुतगिरण्या उभ्या करून त्यांनी इचलकरंजीचा औद्योगिक आणि शैक्षणिक चेहरा उजळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी भरभराट साधली.
जैन समाजाच्या अल्पसंख्यांक दर्जाच्या मागणीला यश मिळवून देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि पारदर्शक नेतृत्वामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दि वर्ल्ड असोशिएशन ऑफ बीट अॅन्ड केन जोअर्स’ च्या उपाध्यक्षपदाचा सन्मानही मिळाला.या सन्मानप्रसंगी सत्कारमूर्तींचा गौरव आचार्य १०८ श्री जीनसेन मुनी महाराज, आचार्य १०८ श्री चंद्रप्रभ सागर महाराज, परमपूज्य क्षुल्लकरत्न १०५ श्री समर्पण सागर महाराज, श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या पावन सानिध्यात आणि प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ. सम्मेद उपाध्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, रवी आवाडे, आदित्य आवाडे यांच्यासह पंचकल्याणक समितीचे रविंद्र पाटील, सुभाष बलवान, बाबासो हुपरे, चंद्रकांत पाटील आणि विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिरीश फोंडे यांच्या निलंबनाविरोधात उद्या राज्य व्यापी आंदोलन

0

गिरीश फोंडे यांच्या निलंबनाविरोधात उद्या राज्य व्यापी आंदोलन

कोल्हापुरात मूक मोर्चा शेतकऱ्यांसोबत शिक्षक, महिला, विद्यार्थीही उतरणार रस्त्यावर

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग विरोधात गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरु असून आंदोलनास नैतिक समर्थन देणारे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. याविरोधात उद्या कोल्हापूर शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भवानी मंडप ते महानगरपालिका असा मूक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये इंडिया आघाडी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, शिक्षक संघटना समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दारूबंदी संघर्ष समिती, सामाजिक संघटना कृती समिती,विद्यार्थी संघटना कृती समिती यांच्यासह सामान्य नागरिक रस्त्यावरती उतरून सनदशीर मार्गाने विरोध नोंदवणार आहेत. या मोर्चात आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, सरोज पाटील, विजय देवणे, एस.डी लाड, सचिन चव्हाण, आर. के. पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. महायुती सरकारच्या आदेशावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ५ एप्रिल रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक वक्तव्य केले असा आरोप ठेवून गिरीश फोंडे यांना ३ एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित केले. त्याचबरोबर पाच एप्रिल च्या दौऱ्या अगोदर दोन दिवस शेतकऱ्यांची धर पकड करत त्यांना पोलीस कसीडीमध्ये ठेवले या विरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांनी देखील सहभागी होण्याची आवाहन संयोजकांनी केले आहे. ही कारवाई तर सुरुवात आहे ही कारवाई पचल्यास इथून पुढे अनेक सामाजिक समस्यांवर नागरिकांनी आपले मत व्यक्त करायची की नाही असा प्रश्न निर्माण होईल. जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार अनु पाहत आहे त्यामध्ये अशीच मुस्कटदाबी लोकांची होणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

0

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोटरी प्रीमियर लीग – आरपीएल २०२५ या क्रिकेट स्पर्धेला शनिवार १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या स्पर्धेतील सहा संघातून कोल्हापूर , सांगली बेळगाव, हुबळी , रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील ७८ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत.आर पी ग्रुप हेरंब शेळके हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून हॉटेल द क्यूबिक हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत, अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत आणि इव्हेंट चेअरमन रवी मायदेव यांनी दिली .
रोटरी मधील खेळाडूंमध्ये संघ भावना वाढीस लागावी आणि मैत्रीची संबंध वाढावेत या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. यामध्ये उद्योजक संग्राम पाटील यांचा एमडब्ल्यूजी सुपर किंग्स, उद्योजक तेज घाटगेआणि डॉ.संजय देसाई यांचा माई हुंडाई सिद्धिविनायक , उद्योजक संजय भगत आणि टी.आर.पाटील कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स , व्यंकटेश बडे यांचा बडेज लकी लेजंडस, संजय कदम आणि सचिन परांजपे यांचा लाईफ लॉंग मोती महल, निलेश पाटील यांचा हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघाचा समावेश आहे . विजेते आणि उपविजेत्या संघाबरोबरच प्रत्येक सामन्यातील सामनावीर ,मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त षटकार मारणारा खेळाडू अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी क्लब सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को – चेअरमन डॉ.महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ, फ्रेंचाईजी कमिटी प्रमुख संग्राम शेवरे, अभिजीत भोसले ,दाजीबा पाटील, निलेश पाटील यांच्यासह रोटेरियन कार्यरत आहेत.

मानाच्या सासन काठी क्रमांक ४० चा पर्यावरण पूरक उपक्रम प्रशासनाचे लक्ष वेधून गेला!

0

मानाच्या सासन काठी क्रमांक ४० चा पर्यावरण पूरक उपक्रम प्रशासनाचे लक्ष वेधून गेला!

भुये (ता. करवीर) /प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र वाडी-रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील चैत्र यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडली. या यात्रेत सर्व मानाच्या सासनकाठ्यांनी सहभाग घेतला. मात्र यंदा एक वेगळीच झळाळी दिसून आली ती सासनकाठी क्रमांक ४० म्हणजेच भुये (ता. करवीर) येथील सासनकाठीच्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे.या सासनकाठीच्या मानकऱ्यांनी यंदा प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, “पर्यावरण वाचवा” असे जोतिबाला साकडे घालण्याचा निश्चय केला होता आणि त्यानुसार संदेश देण्यासाठी विशेष प्रबोधनात्मक फलकांसह जोतिबा चैत्र यात्रेमध्ये सहभागी झाले सासणकाठी ची बारी सुरू होताच दुपारी ३ वाजता काठी क्रमांक ४० रांगेत पुढे सरकली आणि तिच्यासोबतच भुये गावच्या ज्योतिबा भक्तांनी पर्यावरण जनजागृती बाबत फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.
प्रत्येक भक्ताच्या हातात कापडी पिशव्या, डोक्यावर “चांगभलं – मानाची सासनकाठी नंबर ४०” असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या आणि हातात पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक होते. “प्रत्येक जोतिबा भक्तांनी हातामध्ये फलक घेतले होते त्यावरती जंगलतोड रोखू पर्यावरण वाचवू ,प्लास्टिक मुक्त व केमिकल मुक्त गुलाल चैत्र यात्रा साजरी करु, ज्योतिबावरती वृक्षारोपण करू पर्यावरणाचे संगोपन करू ,वनवा पेटवू नका, ज्योतिबा डोंगरावरील उत्खनन थांबवा ,प्रशासनास सहकार्य करा ,कापडी पिशवीचा वापर करा , लावा झाडे तर जगेल पुढची पिढी. अशा प्रकारचे फलक भाविकांचे लक्ष वेधत होते ..
यावेळी सासनकाठीच्या परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करून सासणकाठी परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले की, अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागातील प्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना या सासनकाठी सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी भुये, भुयेवाडी, निगवे, शिये, जठारवाडी या पंचक्रोशीतील जोतिबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
एकूणच सासनकाठी क्रमांक ४० ने यंदाची चैत्र यात्रा केवळ भक्तिभावानेच नव्हे तर सामाजिक जाणीवेनेही गाजवली, आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवला.

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात जोतिबा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पडली पार

0

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे साकडे

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची उपस्थिती

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात जोतिबा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पडली पार

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाने नाहून निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे, धैर्यशील तिवले उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले.
सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक संपन्न झाला. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी जि. सातारा या सासनकाठीचा असतो. त्यानंतर मौजे विहे ता. पाटण, नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज ता. मिरज, कसबा सांगाव ता. कागल, किवळ जि. सातारा, कवठेएकंद जि. सांगली यांच्यासह मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या. यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे २५ हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच डोंगरावर ३० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले. अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी, पार्किंगची ३४ ठिकाणी व्यवस्था, विविध ठिकाणी अन्नछत्र, दर्शन रांग व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी सनियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती

जोतिबाच्या नावानं चांगभलं…. म्हणत देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो. ज्योतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या तसेच बैलगाडी, खासगी वाहनातून, चालत भाविक डोंगरावर दाखल झाले. जोतिबा मंदिरात पहाटे धार्मिक विधीनंतर सोहळ्यास प्रारंभ झाला.

आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव -६ लाखाहून अधिक वह्यांचे संकलन,

0

आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
-६ लाखाहून अधिक वह्यांचे संकलन,

यशवंत निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या गर्दी
विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम साजरे

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस शनिवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम धडाक्यात राबवून सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करण्यात आली. यावेळी शुभेच्छा म्हणून ६ लाखांहून अधिक वह्या संकलित झाल्या.
हनुमानजयंती दिवशीच सतेज पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे होमटाऊन कसबा बावडा ‘सतेजमय’ झाले होते. कोल्हापूर शहरासह दक्षिण, राधानगरी, करवीर, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, भुदरगड, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज परिसरात समाजपयोगी उपक्रम व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
आमदार सतेज पाटील यांनी सकाळी ग्रामदैवत हनुमान आणि दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतले. सकाळी आई सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. राजश्री काकडे, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून आमदार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
‘यशवंत निवास’ समोर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये दुपारी ४ वाजल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य सामाजिकसह विविध क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवर कार्यकर्ते मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, माजी खा संभाजीराजे छत्रपति, आ नितीन राऊत, खास. धैर्यशील माने, आमदार अतुल भोसले, काँग्रेसचे नेते अनिस अहमद, सुनील केदार, यशोमती ठाकूर , विशाल मुत्तेमवार, खासदार मुकुल वासनिक, विशाल प्रकाशबापू पाटील, अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, अरुण लाड, इम्रान प्रतापगडी, वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड, मोहन जोशी, सचिन सावंत, कुणाल पाटील, विक्रम सावंत,असलम शेख, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, मोहन जोशी, गुजरातचे विरोधी पक्ष नेते परेश धनानी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, खा ओमराजे निंबाळकर, वैभव नायकवडी, रजनीताई मगदूम पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, योगेश जाधव, संजयबाबा घाटगे, भानुदास माळी, यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या.
खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राजूबाबा आवळे, सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, के. पी. पाटील, कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सवदी, सांगलीचे पृथ्वीराज पाटील, जि. प. माजी अध्यक्ष राहूल पी पाटील, राजेश पी पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, युवराज पाटील (बापू )
हातकणंगले सभापती महेश पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे,सुनील मोदी, सुनील शिंत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, बाळ पाटणकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि सर्व संचालक, क्रीडाईचे के.पी.खोत आणि संचालक, राहुल देसाई, राहुल खंजीरे, राजू लाटकर, महादेवराव अडगुळे, हरिदास सोनवणे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, गिरीश फोंडे, बाळासाहेब सरनाईक, स्मिता गवळी, सुप्रिया साळोखे, मानसिंग बोंद्रे, सचिन चव्हाण, संजय मोहिते, राहूल माने, आदिल फरास, महेश सावंत, अभिषेक शिंपी विक्रांत पाटील, शाहू काटकर, मधुकर देसाई, काँग्रेसचे माजी नगरसेवक, विविध तरुण मंडळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

विविध सामाजिक उपक्रम

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘देवूया गरजूना साथ, वाढदिनी मदतीचा हात’ या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते व विविध संस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. इचलरकंजी काँग्रेस कमिटीच्या वतीने अब्दुललाट येथील बालोद्यान वस्तीगृहात अनाथ मुलांना अन्नदान वाटप व इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बालकल्याण संकुल येथे अन्नदान करण्यात आले. माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्या वतीने कलिंगड वाटप करण्यात आले. रामकृष्ण (बंडू) जाधव यांच्यावतीने कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

६ लाखाहून अधिक वह्या संकलित

गेली १५ वर्षे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम आमदार सतेज पाटील यांच्याकडून राबवला जातो. या उपक्रमाला यावर्षीही प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये ६ लाखाहून अधिक वह्या संकलीत झाल्या.

गर्दीचा महापूर

सर्वसामान्य जनतेचे लाडके नेते आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ‘यशवंत निवास’ समोर अक्षरशः गर्दीचा महापूर उसळला होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी ४ वाजल्यापासून रात्री साडेनऊ पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वृद्ध नागरिकांच्या शुभेच्छा

मातोश्री वृद्धाश्रमातील सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वृद्ध महिला पुरुषांची ही भेट व त्यांच्या शुभेच्छा अत्यंत भावस्पर्शी ठरल्या.

गुळाची तुला

शिव शाहू मुस्लिम संघटना यांच्यावतीने सतेज पाटील यांच्या वजणाइतकी गुळाची तुला केली. यावेळी या गुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी तोफीक मुलाणी, झाकीर कुरणे, अमर समर्थ, मुस्ताक मलबारी, प्रवीण पुजारी, रियाज सुभेदार, अख्तर इनामदार, मुजीफ महात उपस्थित होते

“चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळ उपांत्य फेरीत

0

“चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळ उपांत्य फेरीत

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेत आज उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. आज वेताळमाळ तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळाचा टाय ब्रेकरवर ३-२ असा पराभव करत, उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामन्याची सुरुवात मॅकचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, अॅड विद्याधर चव्हाण, उद्योजक दीपक निकम, रणजीत मोरे, राजेंद्र साळोखे, यशवंत पाटील, नितीन दलवाई, अनिल कोराने, संजय पवार, प्रवीण तावरे, शशिकांत चिगरे, सनी चौगुले, दीपक निकम, राजू साळोखे, राजाराम निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
वेताळमाळ तालीम मंडळ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. निर्धारित वेळेत हा सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे टाय ब्रेकर वरती सामन्याचा निकाल लागला. यामध्ये ३-२ असा शिवाजी तरुण मंडळाचा पराभव करत वेताळमाळ तालीम मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वेताळमाळ तालीम मंडळाच्या विशाल कुरणेची निवड झाली.
युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव, फत्तेसिंग सावंत, सागर भांदिगरे, मोईन मोकाशी यांच्या हस्ते सामनाविरचे बक्षीस देण्यात आले.

संजय घोडावत आय.टी.आय. मधून ४२२ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथे निवड

0

संजय घोडावत आय.टी.आय. मधून ४२२ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथे निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागात नुकताच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल, पुणे या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध आय.टी.आय. मधून एकूण ४८० विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग घेतला. त्यापैकी ४२२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड टाटा मोटर्सने केली.
टाटा मोटर्सच्या वतीने प्रताप गायकवाड, ओम काकड आणि अभय निकम यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी निवड यादी जाहीर करताना सांगितले. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून आपल्या करिअरची सुरुवात करावी, असे सांगून त्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कंपनीचे अधिकारी प्रताप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचे नियम, मिळणाऱ्या सुविधा आणि पगार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. हा कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी आय.टी.आय. विभागाचे प्राचार्य स्वप्निल ठिकने, गटनिदेशक अविनाश पाटील, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुजित मोहिते यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.