Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeताज्यामहायुती म्हणून आपापल्या लक्ष्मणरेषा आखुया मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

महायुती म्हणून आपापल्या लक्ष्मणरेषा आखुया मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

महायुती म्हणून आपापल्या लक्ष्मणरेषा आखुया मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांची विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे

कोल्हापूर/प्रतिनिधी : दहीहंडीच्या कार्यक्रमात माजी खासदार धनंजय महाडिक म्हणालेत की, बरं झालं मंत्री हसन मुश्रीफ यांना चार वर्षांनी गोकुळ दूध संघामध्ये वासाचे दूध दिसलं. त्यानंतर लगेचच तुम्ही आलात. हे टायमिंग साधून आलात की काय? या प्रश्नावर वासाचे दुधाबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्यादिवशी खासदार श्री महाडिक यांचे भाषण झाल्यानंतर मी वेळाने आलो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये मला त्यांचे ते वक्तव्य समजलं. आता गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला आहे, हे सर्वश्रुत आहे. वासाच्या दुधाबद्दल बामणीच्या कागल तालुका संपर्क मेळाव्यात मी असं म्हणालो होतो की, वासाच्या दुधाबाबत दूध उत्पादकांच्या मनातील शंकांचे निरसन झाले पाहिजे. यामध्ये उत्पादक म्हणतात की, आमचे दूध आम्हाला परत द्या. संघाचे म्हणणे असे आहे की, कायद्याप्रमाणे एकदा दूध घेतले की ते परत देता येत नाही, ते वासाचे निघाल्यास नाश केले पाहिजे. वासाच्या दुधाचे दर संघाने दुप्पट केलेले आहेत. त्यांना मी अशा सूचना दिल्या आहेत की, याबाबतचे तंत्रज्ञान आता प्रगत झाले आहे. दुधात नेमके संस्थेकडून साखर, प्रोटीन, युरिया, पाणी असे पदार्थ मिसळले जातात की, सभासदाकडूनच खराब दूध घातले जाते याची माहिती घेणे गरजेचे आहे यासाठी आता नव्याने विकसित झालेल्या टेक्नॉलॉजीचा आधार घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सभासदांच्या मनातील शंका दूर होतील.असे मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.
सीपीआर औषध व यंत्रसामुग्री खरेदीतील आरोपीसमवेत सी. पी. आर. चे अधिष्ठाता डॉ. एस एस मोरे चहा पीत बसले होते. याबद्दल काय कारवाई करणार….?
या प्रश्नावर मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, हे प्रकरण सन २०२२- २३ सालातील आहे. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळातून सर्जिकल साहित्य खरेदीसाठी दहा कोटी रुपये सी. पी. आर. ला दिले होते व सन २०२२- २३ मध्येच बोगस दरपत्रक सादर करून ही खरेदी झाली होती. त्या पहिल्या चौकशीत कंपनीला ब्लॅकलिस्ट करून फौजदारी दाखल केली आणि दुसऱ्या चौकशीतही तेच झाले. यामध्ये ज्या जबाबदाऱ्या शासनाच्या होत्या, त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आता पोलिसांची जबाबदारी आहे की, पुढील कारवाई करण्याची. दरम्यान; विद्यमान अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे हे फेब्रुवारी 2024 मध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या हातात काहीही नाही. त्यांनी एखाद्याला वाचवतो म्हटले तरी ते शक्य नाही. कारण; शासनाने याआधीच चौकशी करून त्याचा अहवालही प्राप्त झालेला आहे.
गोकुळ दूध संघाच्या टेस्ट ऑडिटच्या संदर्भात उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. तसेच; गोकुळ दूध संघाच्या जागम आणि घड्याळ खरेदी बाबत. तसेच; संचालक मंडळाच्या गोवा सहलीबाबतही जोरदार चर्चा आहेत.या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, टेस्ट ऑडिटमध्ये काहीही निष्पन्न झाली नाही. जे सर्किट बँक पुढे गेलेले त्यांना याची कल्पना नसावी कदाचित. ज्यावेळी नोटीस मिळेल त्यावेळी संघ याचे उत्तर देईल. संघाची संचालक गोवा सहलीला स्वखर्चाने गेले होते. पुढच्या महिन्यात आम्ही केडीसीसी बँकेचे संचालक मंडळ स्वखर्चाने परदेश दौऱ्यावर जात आहोत. याची कोणीही चौकशी करावी. तसेच गोकुळ दूध संघाची जाजम खरेदी योग्य प्रकारे केली असल्याचे संघाने स्पष्टीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. तो राज्यातील ब्रँड बनत आहे. त्याला कोणी अपशकुन करू नये.
गोकुळ दूध संघात संचालिका सौ. शौमिका महाडिक गेली चार वर्षे विरोधात होत्या. आपण अशी अपेक्षा व्यक्त केली की, या वेळेला त्या घोषणा देणार नाहीत, फलक घेऊन येणार नाहीत आणि व्यासपीठावर येतील. त्याचवेळी त्या म्हणाल्या आहेत की, अजून आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत त्यामुळे मी ठरवीन.या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःला काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. अन्यथा; विनाकारण मतभेद तयार होतील. आता त्यांच्या मनात काय शंका आहेत. आमच्या मनात काय शंका होत्या, हेच जर बोलत बसलो तर मतभेद वाढतच राहतील. अर्थात; त्यांच्या मनातील शंका, प्रश्न निरसन करण्याची जबाबदारी अध्यक्ष, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांची आहे. ते त्या दूर करतील. महायुती म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून लक्ष्मणरेषा घालून घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आपण होतो. यावेळी चेअरमन निवडीचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी मी सांगितले होते की, तीन-चार तालुक्यातील जागा रिक्त आहेत, त्या कायद्याप्रमाणे वाढविता येतात. त्या वाढविल्या पाहिजेत. गेल्यावेळची निवडणूक आणि येणारी निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे. त्या निवडणुकीत साडेतीन हजार सभासद होते, या निवडणुकीत साडेपाच हजार सभासद आहेत. एकूणच ही निवडणूक संस्था सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे. त्यामुळे महायुती म्हणून सुद्धा व्यवस्थितपणे आपण निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे.
महायुती म्हणून काम करीत असताना सर्वांनीच एक लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. संयमाने घेतले पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, असे सूचक वक्तव्य श्री. मुश्रीफ यांनी केले.
राहुल पाटील व राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. आता हातकणंगले तालुक्यातील काँग्रेसचा एक नेता राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचे चर्चा आहेत.या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचा फार मोठा गट करवीर तालुक्यामध्ये आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन्हीही मुले राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी सर्वच कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हातकणंगले हा एक मोठा तालुका आहे. तिथून पक्षात कोणी येणार असेल तर त्यांचे स्वागतच करू. त्यांची इच्छा असेल तर अजितदादा पवार यांनाही आणू.
गोकुळ दूध संघाच्या कारभाराबाबत विचारले असता ते म्हणाले, कारभारामध्ये निश्चितच सुधारणा झाली आहे. आम्ही दोन रुपये दूध दरवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापोटी म्हशीच्या दुधाला लिटरला १२ रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला सहा रुपये दूध दरवाढ दिली. संघाला मुंबईमध्ये जागा घेतली, विजेचा प्रकल्प उभारला. असे असले तरी मी असं म्हणणार नाही की, सगळं १०० टक्के दुरुस्त झाले आहे. काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी शंका आहेत. परंतु; ९० टक्के तरी दुरुस्ती झालेली आहे.

जरांगे- पाटील यांना विनंती.

मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष श्री. विखे – पाटील व सदस उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मनातील शंका निश्चितपणे दूर केल्या जातील. तसेच; सध्या गणेशोत्सवाचा आणि सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे, श्री. जरांगे- पाटील हे सुद्धा समजून घेतील. माझीही त्यांना विनंती आहे की, गणेशोत्सवाचा आणि सणावारांचा काळ आहे. त्यांनीही संयम राखावा. शासन मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तुम्ही आता महायुतीमध्ये आहात. मग नेमकं विरोधक कोण आहे? या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. विरोधक कोण आहेत, हे तुम्हालाही माहित आहे. आज त्यांचे नाव घेण्याची गरज नाही.
तुमच्यात व आमदार सतेज पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे विचारले असता ते म्हणाले, असे शाब्दिक युद्ध वगैरे काहीही नाही. राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर आमदार श्री. पाटील यांनी त्यांना डिवचणारी वक्तव्य केली. त्यानंतर मी फक्त त्यांना एवढाच सल्ला दिला की, इतकं हळवं होण्याची गरज नाही.

दररोज पाणी मिळणे हा हक्कच

कोल्हापूर शहराच्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरवासीयांना चार चार दिवस पाणी न मिळणे ही दुर्देवीच बाब आहे. काळम्मावाडी थेट पाईप लाईनमध्ये असणाऱ्या ञुटी दुर करुन शाश्वत पाणी पुरवठा कसा होईल.याकडे लक्ष देण्याच्या सुचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. यासाठी कितीही लागेल तो निधी उपलब्ध करु असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे मंञी मुश्रीफ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments