भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
कोल्हापूर/ प्रतिनिधी: भारतीय जैन संघटना, पश्चिम महाराष्ट्र, डॉ.डी.वाय पाटील कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, जैन डॉक्टर्स फेडरेशन आणि डॉ. शितल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय डॉ. पद्मश्री शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे शनिवारी दिनांक २२ डिसेंबर आणि रविवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत असणार आहे. अमेरिकेचे तज्ञ डॉ. राज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गौतमचंद मुथा, इचलकरंजी आणि प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शीतल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सदर शिबिरामध्ये तपासणी मोफत असून रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. पापण्यांची विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, नाक व कान यावरील बाह्यविकृती या सर्व व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. सर्व समाजातील रुग्णांना याचा मोफत लाभ घेता येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये शिबिराचे हे सातवे वर्ष असून सलग बारा वर्षे या शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच या शिबिरास कृष्णा डायनोस्टिक चे सहकार्य लाभले आहे.
नाव नोंदणीसाठी ९२२५८३९५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ऋषभलाल छाजेड, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत, जितो अध्यक्ष अरुणकुमार ललवाणी, माजी अध्यक्ष गिरीश कर्णावट,पश्चिम महाराष्ट्राचे सचिव अमृतलाल पारख, संघटनेचे सचिव आशिष शहा, मार्गदर्शक पारस ओसवाल, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड रजिस्टर डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील आदी उपस्थित होते.