महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे २२ वे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन २९ व ३० एप्रिल रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर /प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे वीज कंपन्यांमधील वर्ग ४ ते वर्ग १ मधील कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांचे अभ्यासू संघटन म्हणून नावारूपास आलेले आहे. या संघटनेचे २२ वे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन उद्या२९ व ३० एप्रिल रोजी कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन, कोल्हापूर प्रवेशद्वाराजवळ, टोल नाका येथे होणार आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कामगार चळवळीला योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य आणि केंद्रीय उपाध्यक्ष आर.एस.कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. माणगाव परिषदेपासून सुरू झालेला सामाजिक क्रांतीचा लढा यशस्वी करण्यासाठी व भारतातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या आगामी लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी या अधिवेशनामध्ये जे विविध विषयांवर गंभीर विचारमंथन होणार आहे ते त्यांना नवी ऊर्जा व नवी प्रेरणा देणारे ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे वितरण विभाग शोषक भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही हीच कामगारांच्या एकजुटीने तूर्तास थांबली असली तरी संकट अजूनही टळलेले नाही. वीज कंपनीतील कामगारांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा दुरुपयोग थांबून खऱ्या शत्रूची व खऱ्या संकटाची ओळख करून देण्यामध्ये ही या संघटनेची एक महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. वरील सर्व तसेच अनेक विषयांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून ४ ते ५ हजार कर्मचारी, अधिकारी, अभियंते उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे (भा. प्र.से )यांच्या हस्ते होणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल(भा. प्र.से ),महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन (भा. प्र.से )
हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस.पाटील, राष्ट्रीय महासचिव ए.व्ही.किरण आणि समन्वयक डॉ. के. पी .स्वामीनाथन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजय घोडके असणार आहेत.
देशपातळीवरील विचारवंत पुढील दोन दिवसात या चर्चासत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. तरी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.पत्रकार परिषदेस प्रकाश ठोमके, इंद्रजित कांबळे यांच्यासाह इतर पदाधिकारी उपस्थित होते.