जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या पुरस्काराने महिलांना प्रोत्साहन – सरोज (माई) पाटील
“सन्मान स्त्री शक्तीचा” पुरस्कार वितरण सोहळा
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. यासाठी समानतेची सुरुवात स्वतः च्या घरापासून करा. स्त्रियांनी आपली जागरूकता आणि समानता आपणच जपली पाहिजे. स्त्रियांना मिळणारे हक्क त्यांनी नाकारू नये. महिलांनी निर्भय होणे, जागृत होणे तसेच वाचन आणि विचार करणे ही काळाची गरज आहे. १९०८ ला प्रथम महिला दिन साजरा झाला. मात्र आजही महिला सुरक्षीत नाहीत ही मोठी शोकांतीका आहे असे मत अनिसच्या अध्यक्षा सरोज (माई) पाटील यांनी व्यक्त केले.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशने पुरस्कार देऊन महिलांना प्रोत्साहन दिले, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगत महिलांनी निर्भयपणे आपली प्रगती केली पाहिजे, असे आवाहन अनिसच्या अध्यक्षा सरोज (माई) पाटील यांनी केले.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनेच्यावतीने महिला दिनानिमित्त “सन्मान स्त्री शक्तीचा” पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावेळी शांतादेवी डी. पाटील, डॉ. गीता पिल्लाई, उपायुक्त टीना गवळी, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर प्रमुख उपस्थित होत्या. हा कार्यक्रम दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे उत्साहात पार पडला.
सरोज पाटील म्हणाल्या, महिला कोणत्याही प्रसंगाला न खचता सामोरे जातात. बऱ्या- वाईट प्रसंगांचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात असते. महिलांनी आपले हक्क नाकारू नयेत. महिलांमध्ये समानता आणि जागृतता महत्वाची आहे. समानतेची सुरूवात स्व:च्या घरापासून केली पाहिजे. महिलांच्या प्रगतीमध्ये पुरूषांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच आज राजकारण शिक्षण, क्रीडा, कला, अभियंता आदी क्षेत्रात महिला पुरूषांच्याबरोबरीने कार्यरत आहेत.
यावेळी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ पुरस्काराने सुप्रिया चौगुले, स्नेहा गिरी, नसिमा हुरजूक, ऐश्वर्या जाधव, डॉ. सुषमा जगताप, उज्वला खेबुडकर, स्मिता खामकर, विद्या माने, कांचनताई परूळेकर, डॉ. मंजुश्री रोहिदास यांना सन्मानित केले.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव यांनी प्रास्ताविकात फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समाजकार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची ग्वाही दिली.माजी महापौर निलोफर आजरेकर, डॉ. गीता पिल्लाई, नसिमा हुरजूक यांनी मनोगत व्यक्त केली.
गेल्या आठ दिवसापासून घेतलेल्या पाककला, फ्रुट डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन, सॅलड, रांगोळी, मेहंदी, केशभूषा, वेशभूष्य, खेळ पैठणीचा, लहान मुलींसाठी चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिस देवून गौरवण्यात आले. तसेच महिलांसाठी झुंबा वर्कशॉप, आरोग्य व आहार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष संध्या घोटणे, नगरसेविका वृषाली कदम, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, माधुरी लाड, छाया पवार, शोभा कवाळे, अश्विनी बारामते, दीपा मगदूम, महेरजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकारी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.