उद्या रविवारी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सिद्धगिरी जननी आयव्हीएफ सेंटरचा लोकार्पण सोहळा,पाच हजार महिलांची लक्षणीय उपस्थिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा शृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्वावर अत्यंत कमी खर्चात पारदर्शक सेवा देणाऱ्या धर्मादाय श्रेणीतील पहिले ‘सिद्धगिरी जननी’ या आय.व्ही.एफ. टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वा. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रांगणात मा.ना.शशिकला जोल्ले (मंत्री – धर्मादाय, हज्ज व वफ्फ बोर्ड, पालकमंत्री –विजयनगर, कर्नाटक) ,मा.खासदार आण्णासाहेब जोल्ले, लोकनियुक्त एसपी यशोदा वंटगोडी, विविध मान्यवर व पाच हजार महिलांच्या उपस्थितीत होणार आहे, तरी नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी व ‘सिद्धगिरी जननी’ विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा विवेक पाटील,डॉ. संदीप पाटील यांनी पत्रकार परिषेदेत केले.
यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली आय.व्ही.एफ. सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आज वंध्यत्व निवारणासाठी उपचार घेणे हि सामन्यांच्या आवाक्यातील बाब राहिलेली नाही. अपत्य प्राप्तीसाठी आज अनेक दांपत्य वैद्यकीय उपचार घेत आहेत, बदलत्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात वंध्यत्व हि एक गंभीर समस्या होऊ शकते. यावर उपचार घेणे सामान्य लोकांना परवडणारे नाहीत , हि सेवा सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार इतरत्र असणाऱ्या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात व पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विभागा करिता कर्नाटकच्या जोल्ले परिवाराने महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या हस्ते या विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे या विभागात आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपारिक आयुर्वेदिक उपचारांचा हि समावेश केल्यामुळे रुग्णांना दुष्परिणाम विरहीत सेवा मिळणार आहे. तरी ज्यांना लग्न होवून हि अनेक वर्ष अपत्य झाले नाहीत अशा दांपत्या करिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी जननी’ विभाग आशेचा किरण ठरेल. या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा.या वेळी अधिक माहिती देताना डॉ.वर्षा पाटील म्हणाल्या, “पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार व जोल्ले ग्रुपच्या योगदानाने हा विभाग कार्यान्वित होणार आहे. या विभागामुळे वंध्यत्व उपचार अत्यंत पारदर्शकपणे करण्यास अधिक हातभार लागणार आहे. सिद्धगिरी जननी विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता इतर खाजगी केंद्रांच्या तुलनेत १/५ इतक्या कमी खर्चात हि सेवा दांपत्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यंत कमी शुक्राणूंच्या संख्येसाठी इंट्रा सायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच क्रॉनिक पीसीओडी किंवा खूप कमी AMH साठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने इथे उपचार करण्यात येतील. तसेच तरुण जोडप्यांसाठी बेसिक इंट्रा यूटेराइन इन्सेमिनेशन (IUI) हि उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक दांपत्याला सुरुवातीलाच उपचार प्रक्रियेची सर्व माहिती पारदर्शकपणे दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आयुर्वेदिक चिकित्सा यांचा मिलाफ करत येथे केलेल्या उपचारामुळे रुग्णांचे वंध्यत्व निवारण लवकर होण्यास मदत होईल. तसेच गरोदर मातांच्यासाठी महारष्ट्र व कर्नाटक येथे पहिल्यांदाच निवासी ‘गर्भसंस्कार’ विभाग हि कार्यान्वित आहे याचा लाभ हि सदृढ अपत्यासाठी होणार आहे.”
यावेळी डॉ. वर्षा पाटील यांनी या विभागाच्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीने, डॉ.वर्षा पाटील यांना व्हेनिस, इटली येथे होणाऱ्या १९व्या जागतिक मानव पुनरुत्पादन काँग्रेसमध्ये ‘भारतातील आजची प्रजनन काळजी परिस्थिती आणि त्यावरचे उपाय’ यावर शोधनिबंध सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या पत्रकर परिषदेत विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश भरमगौडर, धनंजय जाधव,राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सागर गोसावी यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.