तपोवन मैदानावर दि. २३ ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन
देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग – आमदार सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात मोठे भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२२ चे येत्या २३ ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते .
याबाबत अधिक माहिती देताना आमदार सतेज पाटील यांनी प्रदर्शनाचे 2022 हे 4 थे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, २०० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, आधुनिक शेतीसाठी प्लास्टिकचे महत्व, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
देशातील आघाडीच्या संशोधन पर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे यासाठी कार्यरत आहेत.
या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिद्धीक ऑईल, मयुरेश इंडस्ट्रीज, मिल्क फूड इंजिनियर्स, धनलक्ष्मी आटा चक्की, समृद्धी सोलर आणि मालपाणी ग्रुप, फिनोलेक्स श्री एंटरप्राईजेस, संकेत बायो, रोहन हायटेक ॲग्री, कृष्णा ट्रेडर्स, नवजीवन ॲग्रो, बेनेली बाईक, युनिक ह्युंडाई, कदम बजाज, चेतन मोटर्स, पॉवर सोल्युशन, रॉयल इन्फिल्ड, पॉवर ट्रेलर्स, ट्रॅक्टर रेनबो कंटेनर्स, बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पाहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत.
प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. शिवाय आत्माच्या वतीने ही शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. तांदूळ महोत्सव देखील भरविण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी अशा नमुन्यांचे तांदूळ शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत. त्याची विक्री होणार आहे. तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि हायड्रोलिक चारा तयार करणे.
या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत यामध्ये उस्मानाबादी शेळ्या, बोकड, खडकनाथ कोंबड्या, ससे, पांढरे उंदीर, तसेच कुक्कुटपालन, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या, वेगवेगळे बैल, घोडे, म्हैशी वेगवेगळ्या प्रकारची कुत्री, पक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत.
प्रदर्शनामध्ये २४ डिसेंबर रोजी श्री. अरुण देशमुख प्रमुख कृषी विद्या विभाग नेटाफिन इरिगेशन पुणे यांचे सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन या विषयावर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत मार्गदर्शन होणार आहेत. तर दुपारी १२.३० ते २ या वेळेत श्री सुरेश कवाडे शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी यांचे सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.
२५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजता श्री. डॉ. सॅम लुद्रिक पशुधन विकास अधिकारी रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर यांच्याकडून जनावरांचे रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन होणर आहे. दुपारी १२.३० ते २ या वेळेत श्री. अरविंद पाटील प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी मु.पो. नाणीबाई चिखली कोल्हापूर यांचे दुग्ध व्यवसाय कुटुंबाचा आर्थिक आधार या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला आ ऋ्रतुराज पाटील अँग्री कल्चर कॉलेजचे डॉ अशोक पिसाळ (विस्तार विद्यावेत्ता ), जालींदर पांगरे, कृषी अधिक्षक प्रा जयवंत जगताप (कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तळसंदे ) विनोद पाटील, स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते