हर हर महादेव हा चित्रपट झी मराठीने टिव्हीवर प्रदर्शित करु नये – स्वराज्य संघटना
कोल्हापूर/प्रतिनिधी : हर हर महादेव हा चित्रपट झी मराठीने टिव्हीवर प्रदर्शित करु नये म्हणजे नयेच ,सिनेमेटीक लिबर्टीच्या नावाखाली शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड आम्ही सहन करणार नाही वारंवार सांगुन समजत नसेल तर झी स्टुडीओ फोडणार -डॅा. धनंजय जाधव स्वराज्य प्रवक्ता यांनी इशारा दिला आहे.
हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनी १८ डिसेंबर रोजी टिव्हीवर प्रदर्शित करणार आहे. यास छत्रपती संभाजीराजे यांनी पत्र लिहून विरोध केला होता. या पत्रास झी मराठी कडून कोणतेही उत्तर आले नाही. शिवाय, चित्रपट प्रदर्शनाची जाहिरात झी मराठी वाहिनीवर सुरूच असल्याने दि. १३ डिसेंबर रोजी स्वराज्यचे पदाधिकारी अंकुश कदम व विनोद साबळे यांनी झी स्टुडीओ मध्ये प्रत्यक्ष जाऊन चित्रपट प्रदर्शित करू नये, याबाबत झी व्यवस्थापनास संविधानिक मार्गाने इशारा दिला होता.
यानंतर, झी मराठीने चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. ज्याअर्थी त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, त्याअर्थी या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दर्शविल्याचे व वादग्रस्त सादरीकरण केल्याचे एकप्रकारे मान्यच केलेले आहे. तथापि, संपूर्ण चित्रपटाच्या सादरीकरणावरच आमचा आक्षेप असून, तसेच नेमका कोणता भाग वगळणार याची स्पष्टता नसलेने, स्वराज्य संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
कोणत्याही परिस्थितीत झी मराठी वाहिनीने हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम झी वाहिनीला भोगावे लागतील. हर हर महादेव हा चित्रपट टिव्हीवर दाखवने महाराष्ट्रातील शिवप्रेमी व स्वराज्य संघटना सहन करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.