मराठी भाषिक आणि सौदत्ती यात्रेस गेलेल्या भाविकांना संरक्षण द्या ! – सीमाप्रश्नी सर्वपक्षीय समितीचे निवेदन
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या १० वाहनांची मोडतोड करुन उन्माद मांडला आहे. आजच्या घटनेमुळे समस्त महाराष्ट्राला आव्हान देण्याचे काम कर्नाटक सरकारच्या बोटचेपे धोरणाने घडत असून अशावेळी संपूर्ण पक्षांनी पक्षभेद विसरुन एकत्रितपणे सीमावासीय बांधवांच्या पाठीशी राहुन त्यांना बळ देण्याचे काम करणे आपले कर्तव्य आहे. तरी मराठी भाषिक आणि सौदत्ती यात्रेस गेलेल्या भाविकांना संरक्षण द्यावे, असे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सीमाप्रश्नी सर्वपक्षीय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीमा समन्वयक मंत्री व खासदार यांना कर्नाटक सरकारने बंदी हुकूम काढून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई अरे कारेची भूमिका मांडून दोन राज्यात तेढ माजवत आहेत. तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जशास तसे उत्तर देण्याची मराठी भाषिकांची मागणी असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का ? असा प्रश्न असून तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस आपल्या पाठीशी आहे. सीमावासीयांना अपेक्षित अशी निर्णायक भूमिका घ्यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणदिनी कन्नड गुंडांचा हैदोस हा निंदनीय असून निषेधार्ह आहे. तरी मराठी भाषिकांच्या संयमाचा अंत न पाहता केंद्राने हस्तक्षेप करावा, तसेच मराठी भाषिकांच्यावर व कोल्हापूरातून सौंदत्ती यात्रेस गेलेल्या हजारो भाविकांना तातडीने
संरक्षण द्यावे व हल्ले तातडीने थांबवावेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्रांत एकही कर्नाटकांची गाडी येऊ न देण्याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने केला आहे. सीमाप्रश्नी कोल्हापूरकरांनी यापूर्वी वेळोवेळी कर्नाटकात धसका बसेल अशी आंदोलने केली आहेत. यापुढे कधीही सीमाप्रश्नी विस्फोट होवू शकतो याची नोंद घ्यावी.या प्रसंगी वसंतराव मुळीक, गुलाबराव घोरपडे, संभाजी जगदाळे, बबनराव रानगे, प्रसाद पाटील, उत्तम पाटील, संजय पोवार, बाबूराव बोडके, अवधूत पाटील, प्रकाश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.