कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता-कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे नामवंत डॉक्टर डॉ. अजय केणी यांचा इशारा
गाफील व बेफिकीर राहू नका,मास्क, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टंसिंग पाळा
कागल/गोरंबे/शनिवार (शब्दांकन: पत्रकार शिवाजी पाटील- गोरंबेकर)ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूरचे सुप्रसिद्ध ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व नामवंत डॉक्टर डॉ.अजय केणी यांचे कोरोनाविषयी अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन झाले. गोरंबे ता. कागल, जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचा त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे.
महामारी येणार, ती कोणालाही चुकलेली नाही, ती आल्यानंतरच माणसाचं खरं स्वरूप दिसू लागले,प्रत्येक जण स्वार्थी असतो, कोण स्वार्थी नसतो? परंतु तो स्वार्थ कुठल्या टोकाला जाऊ शकतो, हे या महामारीने दाखवून दिले आहे.
आत्ता जरी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात आणि देशात कोरोनाचा कहर कमी होत चाललेला दिसत असला तरी याची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. कारण; आपण सगळे लॉकडाऊनमुळे बंदिस्त होतो. मंदिरे बंद होती, हॉटेल्स बंद होती, चित्रपटगृहे बंद होती.
यापुढे सगळं आता खुलं होणार आहे. लोकांना घरदार चालवण्यासाठी काम हवे, पैसे हवेत. त्यामुळे एक तर या महामारीने मारले जाऊ किंवा उपासमारीने मारले जाऊ.
सवयी बदलणे आणि चांगल्या सवयी लावून घेणे हे तसं खूप अवघड काम आहे. सिगरेट, पान, तंबाखू, गुटखा या सवयी सहजासहजी सुटत नाहीत. तसेच आत्ता आपण हात स्वच्छ धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे यासारख्या सवयी लावून घेणार आहोत. ज्या सवयी आपल्याला नाही आहेत.
थुंकीमुक्त शहर यासारखे अभियान आपल्याला राबवावं लागतंय, हीच मोठ्या शरमेची गोष्ट आहे. सिग्नल तोडणे, रस्त्याच्या मधूनच चालणे, रस्त्यावरच थुंकणे यासारख्या सवयी माणसं बदलायलाच तयार होत नाहीत. परंतु; जर मरणाची भीती असेल तर माणसं आपल्या सवयी बदलतात.
कोरोनाने बाधित झालेल्यापैकी ८० ते ८५ टक्के लोकांना घरी राहूनच हा आजार बरा करता येतो. हॉस्पिटलमधील अनुभव लक्षात घेता तरुण लोकांना हा आजार कमी प्रमाणात होतो. परंतु; जे ५० आणि ६० च्या पुढील वयोगटातील आहेत, अशा रुग्णांची संख्या जास्त आहे.
आठ-दहा दिवस घरात आणि गावातच अंगावर काढल्यानंतर ज्यावेळी हे बाधित लोक दवाखान्यात येतात त्यावेळी त्यांचा न्यूमोनिया मोठ्या प्रमाणात पसरलेला असतो. त्यावेळी मात्र डॉक्टर म्हणून उपचार करण्यासाठी आम्हाला मर्यादा येतात. त्यामुळे हा आजार एका विशिष्ट पातळीपर्यंत गेला की तिथून मागे येत नाही.
वयोवृद्ध माणसांची विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषता; ज्यांना मधुमेह आहे, रक्तदाब आहे अशांची.कोरोनाची दुसरी लाट येणारच असेल तर आधी या वृद्ध लोकांना सांभाळावे लागेल.
या आजाराचं वेगळं असं काही वैशिष्ट्य नाही. फुफ्फुसाच्या किंवा फ्लूसारख्या आजाराची जी लक्षणे असतात तीच यामध्ये असतात. ताप येतो, खोकला येतो, हाता -पायामधील ताकद जाऊन अशक्तपणा आल्यासारखे होते. अंग दुखायला लागतं. असं असलं तरी काही ठराविक लक्षणे अशी आहेत जी याच आजाराची आहेत. चव आणि वास न येणे यासारखी लक्षणे दिसताच जरासुद्धा वेळ दवडू नका. तातडीने स्वॅब द्या.
आरटीपीसीआर टेस्टच्या सुद्धा मर्यादा आहेत. कारण; या टेस्टमध्ये कोरोना असूनसुद्धा ३० टक्के लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणे असली तरी तो covid-19 असू शकतो.रुग्ण संख्या कमी होत आहे म्हणून कोरोना गेला असं समजू नका, तो आपल्याबरोबर राहणार आहे आणि त्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकविल्या आहेत.
कोरोना विषाणू हवेतून पसरत नाही, हा संसर्ग संपर्कातून वाढतो,
कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दवाखान्याऐवजी घरीच किंवा हॉटेलमध्येच क्वारंटाईन केले. त्यांना धाप किंवा इतर त्रास कमी होता आणि ऑक्सिजनचे प्रमाण नॉर्मल होते.
ऑक्सीमीटरचे महत्व.
महामारीसारख्या परिस्थितीमध्ये ऑक्सीमीटरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या आजारात ऑक्सिजनची लेव्हल जरी कमी झाली तरी पेशंटला त्याचा त्रास होतो. परंतु; रुग्णाला कळत नाही आपला ऑक्सिजन कमी झालाय. दुसऱ्या आजारांमध्ये ऑक्सिजनची लेव्हल कमी झाली की माणूस घरी बसूच शकत नाही. त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे जावं लागतं, कारण त्यांना धाप लागते.
काही लोकांना बसल्यानंतर ऑक्सिजनची लेवल नॉर्मल येते. परंतु; चालल्यानंतर ती कमी होते, हे अधिक धोकादायक आहे. त्यासाठी सिक्स मिनिट्स वॉक टेस्ट आहे. यामधून खूप लवकर निदान होऊन लवकरच उपचार सुरू होतील. त्यातून रुग्ण तात्पुरता ऍडमिट होऊन अथवा गोळ्या- औषधे घेऊनही बरा होऊ शकतो.
मास्कमुळे कोरोना संसर्गाचा कहर तर रोखून धरलाच. शिवाय; टीबीचे पेशंटही कमी झाले आहेत. फ्लूचे पेशंटही कमी झाले आहेत. कारण; टिबी आणि फ्लूचा प्रसार हवेतून होतो. तसेच, दम्याचेही प्रमाण कमी झाले आहे. फुफुसाचे विकार कमी होत आहेत. मास्कचा वापर यापुढेही चालूच ठेवावा लागेल.
या आजाराची सुरुवात फुफ्फुसाला न्यूमोनिया करून होते. न्यूमोनिया वाढला की पेशंटला धाप लागते. ज्यावेळी धाप वाढते, त्यावेळी परिस्थिती फारच पुढे गेलेली असते. न्यूमोनिया खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आम्ही काही करू शकत नाही. व्हेंटिलेटर लावूनसुद्धा पेशंट बरा होत नाही.कोरोना निव्वळ फुफ्फुसावर हल्ला करीत नाही. तो हृदयविकार सुद्धा करू शकतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण करू शकतो. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण करू शकतो. या गुठळ्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये झाल्यास पाय सुजणे, पाय दुखणे अशा तक्रारी उद्भवतात. स्नायूमध्ये जाऊन अशक्तपणा व सांधेदुखी वाढते.
आतड्यांच्यामध्ये जाऊन हगवणीसारखे त्रास सुरू होतात. त्यामुळे ताप, खोकला, घसादुखी, अशक्तपणा, डोकेदुखी, प्रचंड अंगदुखी, अतिसार, विस्मृती यासह काही लोकांना शुगर नसतानाही शुगर निर्माण होते. कारण स्वादुपिंडामध्ये जिथे इन्सुलिन तयार होतं तिथे हा व्हायरस मारा करतो. किडनीवर परिणाम होऊ शकतो.
या रोगामध्ये त्यातल्या -त्यात एक गोष्ट चांगली आहे. जरी लहान मुलांना झाला तरी तेवढ्या गंभीर स्वरूपात होत नाही.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, वयस्कर माणसं, रक्तदाबाचे रुग्ण, स्थूलपणा, किडनीचा आजार, कॅन्सरचे रुग्ण यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.
पोस्ट कोविड सिंड्रोम्स,औषध उपचार करून बरे झाल्यानंतर सुद्धा या विषाणूची लक्षणे दिसायला लागतात. याला पोस्ट कोविड सिंड्रोम्स म्हटलं जातं. बरं झाल्यानंतरही पुढचे दोन-तीन महिने महत्त्वाचे आहेत. या काळात खोकला होऊ शकतो, धाप लागू शकते. कारण फुफ्फुस अजून पूर्ववत झालेले नसते. छातीत धडधडणे, छातीत दुखणे, पाय सुजणे, पक्षाघात, अर्धांगवायु, असंबंध विचार, अस्वस्थता, नैराश्य ही सगळी या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळेच रक्त पातळ होण्यासाठीच्या औषधासारखी काही औषधे आम्ही नंतर सुरूच ठेवतो. तसेच कोवीड होऊन उपचार घेऊन घरी गेल्यानंतर सुद्धा मास्क, हाताची स्वच्छता, सोशल डिस्टन्स यासारखी काळजी न घेतल्यास पुन्हा होऊ शकतो. याला रीइन्फेक्शन म्हणतात. कारण विषाणू हा आपलं स्वरूप बदलून पुन्हा कोरोना होऊ शकतो. कदाचित आधीपेक्षा हा कोरोना अधिक गंभीर स्वरूपाचा असू शकतो.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता,
फ्रान्स, इंग्लंड, इटली या देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला होता. परंतु; तिथे पुन्हा नवीन रुग्ण सापडू लागलेत. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु; तिथली माणसंही आपल्यासारखीच निवांत झाली. त्यांनी शाळा -कॉलेज, सिनेमागृहे सुरू केली आणि पुन्हा पेशंट वाढायला लागले. आम्हाला आणि सरकारलाही भीती वाटत आहे की दसरा आलाय, तोंडावर दिवाळी येत आहे.
सात महिन्याच्या लॉकडाऊननंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडणार आहेत. म्हणूनच दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारने, आमच्यासारख्या दवाखान्यानीही तयारी करून ठेवली आहे.
परंतु; दुसरी लाट आपण थोपवू शकतो. कारण; आपल्याला आता माहित झालं आहे की काय केलं म्हणजे ही लाट वाढणार नाही. त्यामुळे दुसरी लाट बघायची नसेल तर गाफील व बेफिकीर राहू नका. स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. संभाव्य रुग्णाचा द्वेष करू नका, त्यांना वाळीत टाकू नका.