‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर/(जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्यांमध्ये अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले असून ही दौड दहा किलोमीटर इतकी असणार आहे.तसेच पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार यांची चंदगड ते पन्हाळा मार्गावर सायकल फेरी होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध घटक मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती श्री. बलकवडे यांनी दिली.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या सर्व वीरांचे स्मरण करण्याची ही संधी असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यात आपला सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन श्री. बलकवडे यांनी केले.