कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करा – आ. सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आ. सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून सुमारे १८०० खातेदारांची ६४ एकर जमिन संपादित करण्यात येणार आहे. या संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी या बैठकीत आढावा घेतला. कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि धावपट्टी विस्तारीकरणाला देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवल्यास धावपट्टीचे विस्तारीकरण २३ मीटर पर्यंत करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांचे पैसे द्यावे लागतात ते तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करा. अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या. उजळाईवाडी ते विमानतळ मार्गाचे चौपदरीकरण यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मिळण्याकरिता तसेच उजळाईवाडी ते नेर्ली तामगाव हा रस्ता ‘नवीन बाह्य वळण रस्ता’ होण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही विषय मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच आपण भेट घेवून चर्चा करू. असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.यावेळी विमानतळ विस्तारीकरणासाठी ट्रान्समिशन, विद्युत व्यवस्था, अंतर्गत रस्ते आदी विविध विकास कामांचा देखील आमदार सतेज पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शाम कुंभार, कार्यकारी अभियंता एस आर पाटील, प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.