केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव – आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाले आहे. परंतु, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी आमदार श्री. मुश्रीफ यांना विचारले, राज्यातील सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक जिल्ह्यातही केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघामध्ये सत्ताबदल होईल, असा दावा करीत आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना आमदार श्री. मुश्रीफ यांनी हा खुलासा केला.
यावेळी बोलताना आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाची सत्ता याबाबत केलेला दावा मी प्रसारमाध्यमांमध्ये वाचला आणि बघितला. खासदार धनंजय महाडिक यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. दरम्यान; या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.
ते पुढे म्हणाले, केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नाही. कारण वरती जरी सत्ता बदल झाला असला तरी ही सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातील आहेत, परकी नाहीत. निवडून आलेले जे संचालक आहेत त्यांच्यासाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसावा.
बँकेची सत्ता अनेक वर्ष आपल्याकडे आहे. गोकुळ दूध संघाची सत्ता वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे आलेली आहे. गोकुळच्या इतिहासात म्हशीच्या दुधाला लिटरला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला पाच रुपये इतकी उच्चांकी दूध दरवाढ केलेली आहे. वार्षिक तीन हजार रुपये कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल वाढलेली आहे. तसेच; यापूर्वी दूध पावडर निर्मितीमध्ये गोकुळ दूध संघाला कधीच फायदा होत नव्हता. निव्वळ गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १२ कोटी रुपये फायदा हा दूध पावडर विक्रीमधून झालेला आहे. “त्यांना खाजगीत पटवून देईन…..”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, नजीकच्या काळात खासदार धनंजय महाडिक आणि माजी जर खाजगीत भेट झाली तर मी त्यांना समजावून सांगून पटवून देईन. या दोन्हीही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना समजावून सांगेन. त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत, असा विश्वासही आमदार श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.