८ एप्रिलला प्रदर्शित होणार ‘गुल्हर’
कोल्हापूर/प्रतिनिधी : शीर्षकातील अनोखेपण आणि कथानकातील त्याचं अचूक विश्लेषण यामुळं आज मराठी सिनेमानं जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवलं आहे. रसिकांचं लक्ष वेधून घेणारं शीर्षक आणि त्या अनुषंगाने सादर केलं जाणारं कथानक ही काही मराठी चित्रपटांची खासियतच बनली आहे. अशाच सिनेमांपैकी एक असलेला ‘गुल्हर’नं मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांसोबतच संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये कुतूहल जागवण्याचं काम केलं आहे. बर्याच देश विदेशातील पुरस्कारांमध्ये बाजी मारून उत्सुकता जागवणारा ‘गुल्हर’ हा सिनेमा ८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘गुल्हर’ची निर्मिती शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी पुन्हा एकदा काहीसा आव्हानात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस केलं आहे. प्रवाहापेक्षा वेगळं कथानक असणारा हा चित्रपट बऱ्याच वैशिष्ट्यांनी सजला आहे. या चित्रपटाचं कथानक धनगर समाजातील एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आलं असून, त्याच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना एक छानशी गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटातील संवाद आणि बोलीभाषा मनावर ठसणारी आहे. यातील लोकेशन्स यापूर्वी कधीही कोणत्या सिनेमात पाहण्यात आलेली नसल्यानं त्यातील नावीन्य नक्कीच प्रेक्षकांच्या नजरेत भरणारं आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टरचा लुक खूप वेगळा असून, कथानकात प्रत्येकाला वाव देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळं यातील अगदी लहानातील लहान व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरेल. यातील गाण्याचा बाजही काहीसा निराळा असून, ‘लहर आली, लहर आली गं…’ हे अजय गोगावलेंच्या आवाजातील सुरेल गाणे संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारे आहे. टायटल रोलमध्ये असलेल्या बाल कलाकारापासून सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय करत चित्रपटात जीव ओतला आहे. या सर्वांचं उचित सादरीकरण करण्याचं काम दिग्दर्शक या नात्यानं रमेश चौधरी यांनी चोख बजावलं असून, निर्मात्यांनी दर्जेदार निर्मितीमूल्यांचा अट्टाहास धरत एक परीपूर्ण मनोरंजक चित्रपट बनवला आहे.
विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ आदी कलाकारांनी यात अभिनय केला आहे. ‘गुल्हर’ची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. गीतकार वैभव कुलकर्णी गाणी लिहिली असून, संगीतकार पद्मनाथ गायकवाड यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. कोरिओग्राफी विशाल पाटील यांची आहे, तर छायालेखन व संकलन कुमार डोंगरे यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांनी दिलं आहे, तर साऊंड डिझाईन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड म्हणून अमर लष्कर यांनी काम पाहिलं आहे.