सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
हृदयविकाराने कर्तव्यावर असतानाच शहीद झालेले जवान राकेश निंगुरे यांच्यावर बानगेत अंत्यसंस्कार
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वडील बाळासाहेब, आई विमल, पत्नी श्रीमती गीतांजली, मुलगा कु. आर्यन व मुलगी कु. राजनंदिनी या कुटुंबीयांचे केले सांत्वन
बानगे/प्रतिनिधी : सैनिकांच्या खडतर त्यागामुळेच भारतभूमी सुरक्षित आहे, असे कृतज्ञता उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बानगे ता. कागल येथील जवान राकेश निंगुरे यांचा चंदिगड – पंजाब येथे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्यावर भावपूर्ण वातावरणात गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन जवान राकेश नींगुरे यांना अभिवादन केले. शहीद जवान राकेश निंगुरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बानगे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.यावेळी पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, भारतमातेच्या रक्षणासाठी सैनिक घरदार व कुटुंबीयांना दूरवर सोडून, जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत त्यांच्या या खडतर त्यागामुळेच आम्ही भारतीय नागरिक सुरक्षित सुखाचे जीवन जगत आहोत. राकेश निंगुरे यांच्यासारख्या कर्त्या कुटुंबप्रमुखाच्या जाण्याने निंगुरे कुटुंबावर जो आघात झाला आहे, तो व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी स्वतः, माझे कुटुंबीय, राज्य सरकार व संपूर्ण महाराष्ट्र या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या कुटुंबियांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहूया.