छोट्या मुलांनी घेतला “कल्टी” सिनेमाचा आनंद
कोल्हापूर /प्रतिनीधी : कोरोना विषाणूसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत कोल्हापूरातील छोट्या मुलांनी रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरच्याच दिग्दर्शकाचा “कल्टी” या मराठी सिनेमाचा आनंद घेतला. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे आदर्श असतात. कोणी नेता, कोणी अभिनेता, कोणी क्रिकेटपटू तर कोणी चित्रकार. परंतु मुलांनी त्यांच्या गुणांचा आदर्श घ्यावा, त्यांच्या ग्लॅमरचा नको, असा संदेश देणारा हा झंप्या उर्फ कल्टी या मध्यमवर्गीय शेतकरी कुटूंबातील मुलाचा “कल्टी” हा सिनेमा पाहून मुलांनी शाहू स्मारक भवन डोक्यावर घेतले.प्रारंभी मिलिंद कोपार्डेकर यांनी प्रास्तविक करुन चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीची माहिती दिली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून “कल्टी” सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक किरण पोटे आवर्जुन उपस्थित होते. ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या हस्ते “सिनेमा पोरांचा” पुस्तक देउन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा सिनेमा दाखविल्यानंतर कोल्हापूर जिल्हयातील सरूड (ता. शाहूवाडी) येथील रहिवाशी आणि या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक किरण पोटे यांच्याशी उपस्थित मुलांनी अनेक प्रश्न विचारुन स्वत:चे शंकासमाधान करुन घेतले, हे विशेष. हा सिनेमा पाहण्यासाठी “अवनी’ संस्थेतील तसेच सुधाकरजोशी नगर येथील लहान मुले आवर्जुन उपस्थित राहिली होती. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे सलीम महालकरी, शिवप्रभा लाड, पद्मश्री दवे, आरती काेपार्डेकर, श्रीनाथ काजवे, चंद्रकांत तुदीगाल, घनश्याम शिंदे, अभय बकरे, गुलाबराव देशमुख, उदय संकपाळ यांच्यासह “अवनी’च्या वनिता कांबळे, रेश्मा चव्हाण, सोहमचे वडील दीपक कळके आणि भाउ आरोह हेही उपस्थित होते.
उस वाचवणारा छोटा सोहम ठरला हिरो
या कार्यक्रमात प्रारंभ प्रयाग चिखलीतील चाळीस एकरातील शेतकऱ्याचा उस प्रसंगावधान राखून आगीपासून वाचवणाऱ्या सोहम दीपक कळके या दहा वर्षाच्या मुलाला चिल्लर पार्टीने आमंत्रित केले होते. वय लहान असले तरी आपण एक जबाबदार नागरिक आहोत, याचे भान ठेवून लोकांना ओरडून जमा केल्यामुळे सामान्य शेतकऱ्याचा उस वाचला. त्याची माहिती व्यासपीठावरुन सांगताच उपस्थित मुलांनी टाळ्याच्या गजरात त्याचे कौतुक केले आणि छोटा सोहम त्यांचा हिरा ठरला. त्याचे भेटवस्तू आणि “सिनेमा पोरांचा” हे पुस्तक किरण पोटे यांच्या हस्ते देउन स्वागत करण्यात आले. यावेळी सोहमने आपले मनोगत व्यक्त केले.
मुलांनी कुरकुरे केले जमा
सिनेमा पाहण्यापूर्वी चिल्लर पार्टीमार्फत कुरकुरेसारखे पॅकिंगमधील पदार्थ न खाण्याच्या आवाहनाला या छोट्या दोस्तांनी प्रतिसाद देत आपल्याजवळील असे पदार्थ व्यासपीठावर जमा केले. चांगले खा, घरचे खा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, पुस्तके विकत घेउन वाचा यासारखे आवाहन चिल्लर पार्टीमार्फत प्रत्येक सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान केले जाते. त्याला मुले प्रतिसादही देतात. यावेळीही भरगच्च शाहू स्मारकमध्ये उपस्थित लहान मुलांपैकी फारच कमी मुलांनी अशाप्रकारचा खाउ आणला, याबद्दल मुलांचे चिल्लर पार्टीमार्फत कौतुक करण्यात आले.