नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा
अनावरणाचा मार्ग मोकळा, सर्व शासकीय परवानग्या मिळाल्या
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांनी पंचायत राज्याची संकल्पना मांडून ती अस्तित्वात आणून सत्तेचे विकेंद्रीकरण करुन
जिल्हा परिषद पंचायत समित्यांची स्थापना करून सर्वसामान्य तळातील कार्यकर्त्यांच्या हातात ही सत्तेची धुरा सोपवणारे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गिय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर सर्वप्रथम कोल्हापूरामध्ये स्वर्गिय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना चव्हाण साहेबांना माननारे त्यांच्या संपर्कातील जवळचे कार्यकर्ते माजी कृषि राज्यमंत्री स्व.श्रीपतराव बोंद्रे, माजी महापौर स्व.बळीराम पोवार, राष्ट्रपती पदक सन्मानित विजयसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष एम.के.जाधव, के.ब.जगदाळे, मराठा बँक अध्यक्ष, वसंतराव मोहिते, के.जी.पवार आदींनी या प्रतिष्ठाची स्थापना करुन स्व.चव्हाण साहेबांचा पुतळा कोल्हापूरामध्ये उभारण्याचा
निश्चय केला. काळाच्या ओघात यातील ही एक दोन अपवाद वगळता सर्व मंडळी निधन
पावली. पण चव्हाण साहेबांच्यावरील प्रेम आणि सहकाऱ्यांची इच्छा पुर्ण करण्याचा ध्यास
यातील विजयसिंह पाटील यांनी सोडला नाही. तरुण कार्यकर्ते अशोक पोवार, रमेश मोरे
यांच्यावर ही जबाबदारी सोपवून जेष्ठ कार्यकर्ते उद्योजक व्ही.बी.पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली स्व.चव्हाण साहेबांचा पुतळा तयार केला आणि जिल्हा परिषद, पंचायत
समिती सदस्य सामान्य कार्यकर्त्यांना हा पुतळा स्फूर्ती आणि प्रेरणा देईल या हेतूने त्यांनीच
स्थापन केलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात बसविणेचे
निश्चित केले.
त्याला जिल्हा परिषद सदस्य आणि नेते मंडळींनी एक मुखाने परवानगी दिली
आज पुतळा उभा करायचा म्हणजे त्याला शासकीय परवानगीची फार मोठी वेळ खाऊ
प्रक्रिया आहे. या प्रक्रियेस जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कालावधी जातो. पण
प्रतिष्ठानच्या या कार्यकर्त्यांनी ध्यास घेऊन सहा ते आठ महिन्यात स्वतः फिरुन या परवानग्या
मिळविल्या. त्यामुळे आता तयार असलेल्या पुतळ्याच्या अनावरणाचा मार्ग मोकळा झाला.
यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा न्यायाधिश
कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य कला संचनालय, राज्य पोलीस आयुक्तांचे वतीने जिल्हा पोलीस
प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शहर अभियंता कोल्हापूर महानगरपालिका या सर्वांच्या अभिप्राय आदेशाने मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी पुतळा उभारणीचे आदेश नुकतेच प्रतिष्ठानला दिले आहेत.
त्यामुळे आता पुतळा अणावरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कोविड संसर्गाचा प्रादुर्भावाचे लॉकडाऊन नियोजन पाहून स्व.यशवंतराव
चव्हाण साहेबांचे राजकीय मानसपुत्र खा.शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, स्थानिक मंत्री
महोदय यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन चालू
आहे. मुख्य अडचणीचे शासकीय परवानग्याचे काम पुर्ण झाले आहे. चबुतरा, पुतळाही तयार
आहे.स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोल्हापूर अशोक पोवार रमेश मोरे जयकुमार शिंदे किसन कल्याणकर आदींनीही याकामी पुढाकार घेतला आहे.