कोंडाळामुक्त कोल्हापूरसाठी उपाययोजना करा Bथेट पाईप लाईनचा प्रकल्प मार्गी लावू
– पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर कोंडाळामुकत शहर बनविण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करा, त्यासाठी लागणारे टिपर घेण्याची सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सूचना केली. बैठकीस महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, उपायुक्त निखिल मोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
कचरा उचलण्यासाठी सद्या महापालिकेकडे 104 टिपर असून आणखीन सुमारे 40 टिपर घेऊन केवळ सकाळीच कचरा न उचलता तो दिवसभर उचलण्याची कार्यवाही करुन शहर कोंडाळामुक्त करावे, अशी सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. तसेच कचरा प्रकल्पाची सध्या असलेली 200 टन निर्गतीची क्षमता आणखीन 50 टनांनी वाढविण्याची प्रक्रिया गतीने केली जाईल, असेही ते म्हणाले.
थेट पाईप लाईनचा प्रकल्प निश्चितपणे मार्गी लावू, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, सद्या थेट पाईपलाईन प्रकल्पांतर्गत 49 किलोमिटर पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे, जॅकवेलचेही बहुतांशी काम झाले असल्याने लवकरच थेट पाईपलाईनचे काम मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेचे कामही लवकरणे पूर्ण करण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना युध्दपातळीवर काम करण्याची सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामासाठी शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडून 40 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु आहे. रस्त्याची कामे लवकरच हाती घेतली जातील, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शहरातील रस्त्यामध्ये पडलेली खड्डे बुजविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या –दुसऱ्या आठवडयात रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण केले जाईल, मात्र ज्या रस्त्यांची कामे नियोजनानुसार करण्यात येणार आहेत, त्यांचे पॅचवर्क न करता , रस्ताच केला जाईल. तसेच बिंदु चौक येथील आणि गाडी अड्डा येथील पार्किंग तसेच तावडे हॉटेल येथील मोठया वाहनासाठी नियोजित पार्किंगचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. तसेच लक्ष्मी सरस्वती थिएटर जवळील 7 मजली मल्टीलेवल पार्किंगबाबतही तांत्रिक अडचणी पूर्ण करुन त्यांचीही उभारणी करु. याबरोबरच पंचगंगा स्मशानभूमी येथे इलेक्ट्रिकल करता येईल काय, याबाबत चर्चा करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
शहरातील ट्राफिक सिग्नल उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून हे काम पूर्ण झाले आहे. तसेच आयटी पार्कची उभारणी दोन फेजमध्ये करण्याचे नियोजन असून यासाठी मान्यता मिळाल्यानंतर हा प्रश्नही मार्गी लागेल. स्थानिक आयटी कंपन्याना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरात कंपोनंट ब्लडबॅकेसाठी 1 कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजुर केला असून 2 महिन्यात सामुग्री येउुन काम मार्गी लावण्याची सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधितांना दिली. कोल्हापूर महापालिकेची ई ऑफिस प्रणाली अतिशय चांगली असून राज्यस्तरावरही या प्रणालीचा उल्लेख मा. मुख्यमंत्री महोदयांनी केला, हे कोल्हापूर महापालिकेच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे.
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलला जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल निर्माण करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, महापालिकेच्या प्राथमिक व माघ्यमिक शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कोरोना उपाययोजनासाठी देण्यास संघटनेने सहमती दर्शविली आहे. हा निधी मिळाल्यास आयसोलेशन येथे स्वतंत्र कोरोना हॉस्पिटल विकसित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात औषध फवारणीचा 81 वॉर्डाचा आराखडा तयार करुन सातत्यपूर्ण औषध फवारणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोनामुळे महापालिकेचे 10 कर्मचारी मयत झाले असून 6 कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार देय असणाऱ्या मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत, तसेच अन्य 4 कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना अन्य मार्गानी मदत करण्याबाबत प्रयत्न राहतील, असेही पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
यावेळी कोरानाच्या अनुषंगानेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सविस्तरपणे आढावा घेतला तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिक गतीमान व व्यापक स्वरुपात उपाययोजना करण्याची सूचना केली.
यावेळी महापालिकेच्या विविध अडचणीबाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी सविस्तरपणे निवेदन केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सतिश पाटील, गटनेते शारंगधर देशमुख आदि मान्यवरांनी महापालिकेच्या समस्याबाबत माहिती दिली.
या बैठकीस सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्यलेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, करनिर्धारक संजय भोसले, सिसिटम मॅनेजर यशपाल रजपूत, आशपाक आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.