चंदगडची अभय पतसंस्था फोडणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक; २० लाखाचे ३९० ग्रॅम दागिने जप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्था फोडून ४० लाखाचे ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून २० लाख रुपयांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. महेश उर्फ पिंटू सुबराव कोले, सुनिल उर्फ जान्या रामा तलवार , संतोष उर्फ राजू ज्ञानेश्वर सुतार अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
चंदगड तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांनी कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेत कोविड काळात आपली आर्थिक अडचण असल्यामुळे आपल्या घरातील सोन्याचे दागिने पतसंस्थेत गहान ठेवून कर्ज घेतले होते. शनिवार १२ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेत धाडसी चोरी करून ७५० ग्रॅम दागिने लंपास केले. गहाण म्हणून ठेवलेले दागिने चोरीला गेल्यामुळे सर्वसामान्य नागरीक हवालदिल झाले होते.
अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना या चोरीचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पो.हे. कॉ. श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, विजय गुरखे, किरण गावडे, विठ्ठल माणिकेरी, प्रदीप पवार, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर हे पथक नेमले होते. या पथकाने अत्यंत शिताफीने या चोरट्यांना जेरबंद केले असून चोरीतील साहित्य जप्त केले आहे.