केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन ताल, सूर आणि लय असा त्रिवेणी संगम असलेल्या आनंदोत्सवामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांचा सहभाग
कोल्हापूर/प्रतिनिधी : आजपासून राज्यातील अनेक नाटकांचे प्रयोग सुरु झाले आहेत. कोल्हापूरमध्ये नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत यासाठी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये डिसेंबरपर्यंत ५०% सवलत देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
कोल्हापूर ही कलानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. कलेची मोठी परंपरा कोल्हापूरला लाभली असून ती टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि ती वाढविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे वाटचाल करूयात.
कोरोनामुळे कधीनव्हे ते रंगभूमी आणि रसिकांची ताटातूट झाली. रंगभूमीवर कला सादर करण्यासाठी कलाकार जेवढे आतुरतेने वाट पाहत होते तितकेच किंवा कणभर जास्तच महाराष्ट्रातील रसिक कलाकारांची कला प्रत्यक्ष पाहण्याची पाहत होते. आज रंगकर्मींच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिककाळ रंगभूमीपासून दुरावल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील ५६ हजार लोककलावंतांना प्रत्येकी रु. ५ हजार देण्याचा निर्णय महाविकास आघडी सरकारने घेतल्याने कलाकारांना काही प्रमाणात दिलासा मिळला.
१९ महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. *दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास नाट्यगृहात १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार विचार करत आहे.यावेळी, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे,आमदार चंद्रकांत जाधव, रंगकर्मी प्रसाद जमदग्नी, रमेश सुतार, मुकुंद सुतार, सुनील घोरपडे, धनंजय पाटील, अभिजित कोसंबी, सागर बगाडे आणि रसिक उपस्थित होते.