*कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर*
*कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक*
कोल्हापूर दि.२५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करत आलो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नांवाचा फलक आज लावण्यात आला.
गेले दोन दिवसापासून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर एका उद्योगपतीच्या नावाचा फलक झळकत होता. याबाबत समस्त कोल्हापूर वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मिता दाखवून देण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करीत नावाचा फलक लावण्यात आला. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या” विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, इंग्लंडच्या राणी समोर न झुकता आपला स्वाभिमान संपूर्ण जगाला दाखविला. असे असताना कोणी एखादा उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून आपली जाहिरात करत असेल तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आम्हा कोल्हापूर वासीयांवर थोर असे उपकार आहेत. त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक असून त्यांच्या विचारांनी प्रेरित होवूनच शिवसेना समतेने सामाजिक कार्यात, जनहिताच्या कामात कार्य करत आहे. परंतु, अशा प्रकारे कोल्हापूरच्या स्वाभिमानाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरचा स्वाभिमान दाखवून देवू, असे प्रतिपादन केले.
यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, रणजीत जाधव, राजू पाटील, सुनील खोत, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, किशोर घाटगे, धनाजी दळवी, अश्विन शेळके, निलेश हंकारे, रियाज बागवान, राजू काझी, सनी अतिग्रे, रमेश पोवार, गजानन भुर्के, मंदार तपकिरे, विनय वाणी, सुनील भोसले, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, राज भोरी, सुशील भांदिगरे, अंकुश निपाणीकर, युवा सेनेचे योगेश चौगले, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, दादू शिंदे, केदार वाघापुरकर, टिंकू देशपांडे, अक्षय कुंभार, सागर कलघटकी, विश्वजित चव्हाण, दिनेश साळोखे, राहुल माळी, अक्षय खोत, तन्वीर बेपारी आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.