ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनास सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली आहे. सदर दफनभूमीच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिका प्रशासनास दिल्या. यासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिका येथे आज बैठक पार पडली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील ख्रिश्चन समाज दफनभूमी करिता ब्रम्हपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे सुमारे २० गुंठे जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. परंतु, आजतागायत सदर दफनभूमीच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. सदर जागा श्री.पिरजादे कुटुंबियांच्या नावे असून, श्री.पिरजादे कुटुंबियांना यांना या जागेच्या बदल्यात टी.डी.आर देवून सदर जागा ख्रिश्चन समाज दफन भूमीकरिता हस्तांतरित करणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आणि नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांनी सदर प्रश्न गांभीर्याने घेवून मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावून दफनभूमीची जागा ख्रिश्चन समाजास द्यावी, अशा सूचना केल्या.
याबाबत आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, ख्रिश्चन समाजास दफनभूमी साठी जागा देण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून ब्रम्हपुरी येथील जागा ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी साठी देत असल्याचे सांगितले.यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उप आयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, आरोग्य अधिकारी अशोक पोळ, शहर अभियंता नारायण भोसले आदी उपस्थित होते.