विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया-ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ कागलमधून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानाचा प्रारंभ
कोल्हापूर/कागल/प्रतिनिधी : वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ ऑक्टोबर या अभियानाचा दुसरा टप्पा आहे. २५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जनतेने आणि कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज व्हा, अशी प्रेरणाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
राज्य शासननाच्या ‘माझ कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी झाला. कागल, मुरगूड शहरासह तालुक्यातील ८६ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, घरोघरी सर्व्हे करून अजून बाहेर न पडलेले रुग्ण शोधून त्यांना उपचारापर्यंत आणण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने आणि विशेष करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेला हा कार्यक्रम असून मंगळवारपासून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. आज अनेक व्यक्तींना लक्षणे दिसून येताहेत मात्र असे लोक घाबरून उपचार घेण्यास पुढे येत नाहीत. जे आरोग्यदूत म्हणून सर्व्हे करणार आहेत, त्यांनी न घाबरता काम करावे, अशा सर्वांची जबाबदारी नगरपालिका, शासन घेत आहे. अशा आरोग्य दूतासाठी बाधित झाल्यास उपचाराचा खर्च म्हणून तीन लाख रुपयांचा विमा, दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कागल नगरपालिकेच्यावतीने ११ लाख रुपयांचा विमा तसेच नगरविकास विभागाने २५ लाखाचे विमाकवच दिले असून अनुकंपाचे धोरणही घेतले आहे. त्यामुळे आपण चिंता करु नये. आपण ताकदीने काम करुन कोरोनाचे दहन करुनच थांबायचे आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, विवेक लोटे,ॲड. संग्राम गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे आदी उपस्थित होते.
चौकट…..
कमावलेले गमावू नका……
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूला कागल आणि गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसात जनता कर्फ्यू यशस्वी करून जे कमावले आहे, ते उद्यापासून गर्दी करून गमावू नका. कामाव्यतिरिक्त अजिबात फिरु नका. खरेदी, बाजाराच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळा. सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी वेळ पडल्यास पोलिसांनी बळाचा वापर करावा, पण गर्दी होवू देवू नका. अशा सुचनाही त्यांनी दिल्या. स्वागत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले. प्रास्ताविक प्रांताधिकारी रामहरी भोसले यांनी केले. आभार गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी मानले.