पर्यावरण, शिवराज्याभिषेक दिनी केले जाणार १००० वृक्षारोपण
कोल्हापूर/प्रतिनिधी : वृक्षारोपणाच्या माध्यमातून कोल्हापूर अधिक समृद्ध व्हावे, यासाठी पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिना दिवशी ५ व ६ जून रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी वैविध्यपूर्ण झाडांचं वृक्षारोपण होणार आहे. मदत फाऊंडेशन, सह्याद्री देवराई, शिवराष्ट्र हायकर्सच्या वतीने ही वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. वृक्षप्रेमी मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण चळवळ राबवली जात आहे.
५ जून रोजी शनिवारी पर्यावरण दिनानिमित्त सकाळी ८ वाजता अल्लंप्रभू डोंगर आळते, हातकणंगले, कोल्हापूर येथे वृक्षारोपण होईल.
६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी सकाळी ८ वाजता पन्हाळगड येथील टेलिफोन टॉवर परिसरात वृक्षारोपण होईल. येथील नियोजन पन्हाळा नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली होईल. कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी, गोकुळ शिरगाव येथे वृक्षारोपण केले जाणार आहे. या वृक्षारोपण चळवळीत कोल्हापूर पीडियाट्रिक असोसिएशन, पन्हाळा नगरपालिका, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, कोल्हापूर सीए असोसिएशन, कंपनी सेक्रेटरी असोसिएशन कोल्हापूर, जगद्गुरु अलंप्रभु योगपीठ, लिंगायत परीट समाज महासंघ, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, गुरू गोरक्षनाथ गोशाळाआदींचा या मोहिमेत सहभाग आहे. या चळवळींमध्ये अनेक इच्छुक संस्था सहभागी होऊ शकतात. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, ते झाड दत्तक घेऊ शकणार आहेत.