माझा विद्यार्थी -माझी जबाबदारी
ही मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी
-पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. या लाटेचा मुकाबला प्रभावीपणे आणि एकत्रितपणे करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि इतर माध्यमातील शिक्षकांनी ‘माझा विद्यार्थी- माझी जबाबदारी’ ही मोहीम शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणाली (व्ही.सी.) व्दारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सध्या १५० ओटू बेड तयार करण्यात आले असून १८ वर्षाखालील को-मॉर्बीड विद्यार्थी-विद्यार्थीनींची यादी संबंधित यंत्रणांनी आठ दिवसात तयार करावी. त्याचबरोबर मुले-मुलींच्या मनातील भीती कमी करण्यासाठी, ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांनी किमान एक तास समुपदेशनासाठी राखीव ठेवावा, अशी सूचना करून पालकांनी घाबरून जावू नये असे भावनिक आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी शिक्षक, पालक, आरोग्य यंत्रणा त्याचबरोबर इतर संबंधित घटकांनी एकत्रित यावे. पालकांनीही जबाबदारीने वागावे तसेच शिक्षकांनी स्वत:चीही काळजी घ्यावी. या लाटेत लहान मुलांची त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कशा पध्दतीने काळजी घेता येईल यासाठी येत्या चार दिवसात प्रोटोकॉल तयार केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.
बालकांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. त्याचबरोबर बालकांना या लाटेपासून वाचविण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. येणाऱ्या लाटेच्या अनुषंगाने तालुकास्तरावर कमिट्या नेमण्यासाठी पालकमंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी केली तर कोरोनामुळे व्यक्तीमध्ये शारिरीक, मानसिक आणि भावनिक बदल होतात त्याचा विचार करून शिक्षकांनी मुलांचे प्रबोधन करावे. तसेच या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच संबंधित पालकांनी, शिक्षकांनी त्वरित उपचाराला प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले.
तत्पूर्वी सीपीआर रूग्णालयाच्या बालरोग विभागाच्या विभागप्रमुख तथा टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. संगीता कुंभोजकर यांनी कोरोना आजारपणात बालकांना येणाऱ्या अडीअडचणी, उपचार पध्दती, समुपदेशन पध्दती या संदर्भात सविस्तर विवेचन करून या लाटेचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.
या बैठकीसाठी मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, टास्कफोर्सचे सदस्य सर्वश्री डॉ. व्यंकटेश तरकसबंद, डॉ. सरोदे, डॉ. अनिल कुरणे, डॉ. दशावतार बडे, डॉ. युवराज पाटोळे यांच्यासह ऑनलाईन प्रणालीव्दारे जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, माध्यमिक/प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच पालक उपस्थित होते.