कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. बँकेच्या गेल्या ८२ वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आठवड्यापूर्वीच बँकेने कर्मचाऱ्यांना कोविडसह, अपघाती मृत्यू, इतर व नैसर्गिक मृत्यूबद्दल विमासुरक्षा कवच लागू केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांचा सत्कार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.
भाषणात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेचा कर्मचारी हा नोटांची देवाण-घेवाण आणि ग्राहकांच्या संपर्काच्या रूपाने जीवावर जोखीम घेऊन काम करीत असतो. कर्मचारी व कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार हा विमासुरक्षा कवच लागू केले. दुर्दैवाने कुणाच्या बाबतीत वाईट घडू नये, झालंच तर के.डी.सी.सी.बँक सर्वच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी आहे. बँकेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल अध्यक्ष या नात्याने मला मनापासून आनंद आहे. जोपर्यंत ठेवी वाढणार नाहीत, तोपर्यंत व्यवस्थापन खर्च कमी येणार नाही. या उद्देशाने मी हे ध्येय घेतलेलं होतं. या यशात बँकेचे सर्व ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक, सभासद, सर्व संचालक तसेच कर्मचारी व अधिकारी यांचे मोठे योगदान आहे, अशी कृतज्ञता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वागत व प्रास्ताविकपर
भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए.बी.माने म्हणाले, अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेृत्त्वाखालील गेल्या पाच वर्षाच्या कार्यकालात विद्यमान संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अडीच हजार आवरून दहा हजार केले. दैनिक वेतनावरील १०० कर्मचाऱ्यांना कायम केले. हक्काच्या रजेचा पगार सुरू केला. कर्मचाऱ्यांना ९ % बोनस दिला. गणवेशासाठी बोनसमध्ये वाढ केली. ६४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. अनुकंपा तत्त्वावरील ७० कर्मचाऱ्यांची भरती केली.