डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत नेत्रदीपक यश रोनित नायक देशात प्रथम
कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत आर्मड फोर्सेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी रोनित रंजन नायक यांने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०२० एन.डी.ए. (१४५ वी तुकडी) मध्ये सर्वाधिक गुण मिळवून देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याच बरोबर पंकेश मोठाभाऊ महाले (देशात १२ वा), गौरव मोहन नाथ (देशात ८९ वा), चंदन पुंडलिक हरले (देशात ११५ वा),व पवन सोमेश्वर निर्मल (देशात १७५ वा) या पाच विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग एन.डी.ए. परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले.या त्यांच्या यशामुळे डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिद्द व चिकाटी तीव्र इच्छाशक्ती, अथक परिश्रमाची तयारी, मनाची एकाग्रता, अभ्यासात सातत्य, अफाट ध्येयशक्ती याच्या जोरावर यश प्राप्त व संपादन करता येते हे पूनावाला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले असल्याची माहिती डॉ.सरदार जाधव व संस्थेच्या सचिवा व स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या आर्मड फोर्सेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट या विभागांमध्ये भावी अधिकारी बनविण्याच्या हेतूने एन.डी.ए व तत्सम परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाते या विद्यार्थ्यांचा लेखी, तोंडी व शारीरिक परीक्षेचा सराव दररोज करून घेतला जातो. या विद्यार्थ्यांना सतत आयोजित केलेल्या साप्ताहिक, मासिक परीक्षा, तज्ञ आणि अनुभवी अधिकारी वर्गाची मार्गदर्शन शिबिरे, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन यासारख्या अनेक गोष्टींचा फायदा झाला आहे.लष्करी सेवेतून निवृत्त झालेले अनुभवी अधिकारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.पुनावाला स्कूलने हे विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या भौतिक सुविधा, विविध खेळांची परिपूर्ण मैदाने सैन्य दलाप्रमाणे विद्यार्थ्याची दिनचर्या दर्जात्मक शिक्षण यामुळे विद्यार्थी रोहित रंजन नायक आणि अन्य चार विद्यार्थ्यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोग एन.डी.ए.मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, संस्थेच्या सचिव व उपाध्यक्षा सौ. विद्या पोळ यांची प्रेरणा या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. तसेच स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव,प्राचार्य श्री. मारुती कामत ए.एफ.पी.आय.चे चेअरमन श्री विश्वास कदम, संचालक मेजर चंद्रसेन कुलथे,विद्यार्थ्यांचे आई-वडील यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.पूनावाला स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे स्कूल व विद्यार्थी शिक्षक यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.