शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज वर्ग करण्याचे
समाज कल्याण अधिकाऱ्यांचे महाविद्यालयांना आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https:/mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३ डिसेंबरपासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन हे अर्ज तात्काळ ऑनलाईन प्रणालीतून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील एकुण ४१ हजार ३७० विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्जासाठी नोंदणी केलेली होती. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आजअखेर केवळ ३३ हजार ६०६ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले असून त्यापैकी १४ हजार ५५० अर्ज संस्थास्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येते. सन २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज भरण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. सन २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने संबंधित महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी.