व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला कोल्हापूरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर/प्रतिनिधी : जीएसटी कायद्यातील जाचक त्रुटी आणि ई-वे बिलाविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघ (कॅट) संघटनेने शुक्रवारी देशव्यापी संपाची हाक दिली होती. या संपला कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिला असून शहरातील लक्ष्मीपुरी, गुजरी यासह विविध बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवले आहेत. त्यामुळे जवळपास ४०० ते ४५० कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी म्हंटले आहे. या जाचक अटी तात्काळ मागे घ्याव्यात अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जीएसटी विभागाला याबाबतचे निवेदन देऊन त्यांनी हा इशारा दिला आहे.
आजच्या या भारत बंदच्या आवाहनानुसार कोल्हापूर शहरातील ७० ते ८० टक्के व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून किरकोळ व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय सुरू ठेवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोट्यवधींची उलाढाल येथे ठप्प झाली असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी म्हंटले आहे. जे व्यापारी जीएसटी प्रणालीमध्ये येत नाहीत तेच व्यापार सुरू आहेत. शिवाय आम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलीची परवानगी दिली नसल्याने सर्वच व्यापाऱ्यांना बंद करण्याबाबत सांगू शकलो नाही. मात्र, तरीही अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
या येत आहेत अडचणी
गेल्या तीन ते चार वर्षात करप्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. वारंवार नियम बदलण्यात येत असल्याने करप्रणाली किचकट झाल्या आहेत. विलंब शुल्क अनावश्यक लावले जात आहेत. कर परताव्यात चूक झाल्यास दुरुस्त करता येत नाही. जीएसटी पोर्टल व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे सर्वांचाच बहुमूल्य वेळ कारकुनी काम करण्यातच जात असल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे. भारतातील सर्व छोटे-मोठे व्यापारी उद्योगांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांनाही काम स्वतः करावी लागतात. दरवर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांना वर लागले आहे. त्यामध्ये सर्व व्यापारी यामध्ये भरडले जात असल्याचे सुद्धा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले आहे. यासर्व अटी दूर व्हाव्यात अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी आणि जीएसटी विभागाचे आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रीय संघटन सचिव ललित गांधी, चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, मानद सचिव धनंजय दुग्गे व वैभव सावर्डेकर, खजानिस हरिभाई पटेल, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, तौफिक मुल्लाणी आदी उपस्थित होते.