नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कलाप्रवासाचा
दुर्मिळ संग्रह एनएफएआयकडे प्राप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : सिने खलनायक आणि नाट्य-दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या सिने-नाट्य कलाप्रवासातील वैयक्तिक दुर्मिळ संग्रह दानवे कुटुंबियांकडून राष्ट्रीय चित्रपट
संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आला.उर्दू रंगभूमी तसेच मराठीबरोबर हिंदी चित्रसृष्टी
गाजविणारे दानवे यांनी १९३० च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रतपस्वी भालजी
पेंढारकरांकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला.१९४६ मध्ये पृथ्वीराज
कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत त्यांनी ‘वाल्मिकी’ चित्रपटात काम केले होते.
याशिवाय साठ वर्षाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ‘सावकारी पाश,सासुरवास,
मीठभाकर,मोहित्यांची मंजुळा,मराठा तितुका मेळवावा,आंधळा मारतो डोळा’ अशा
जवळजवळ ६७ चित्रपटातून आणि १३४ नाटकांतून खलनायक व दिग्दर्शक म्हणून काम
केले.
या दुर्मिळ संग्रहात वृत्तपत्रीय कात्रणं,१९३३ पासूनचे हैन्डबिल्स,जवळजवळ २५०
कृष्णधवल छायाचित्रांचा अल्बम,त्यांच्यावर आलेले लेख,जुने पत्रव्यवहाराचे दस्तऐवज,
त्यांच्या हस्ताक्षरातील स्वत: लिहिलेल्या १४ कादंबऱ्या,८ नाटके,५ कथा तसेच
१९३३ मधील ‘हैम्लेट’ या नाटकातील काही विग्ज,मिशांचे अनेकविध प्रकार शिवाय
त्यांच्या समकालीन सह-कलाकारांची ५१ छायाचित्रे आणि दानवेंच्या चित्र-नाट्य
संसारातील विविध भावमुद्रा असणाऱ्या १५ बाय १२ च्या ४० मोठ्या फ्रेमस हा त्यांच्या
कुटुंबियांनी इतकी वर्षे जपून ठेवलेला दुर्मिळ खजिना कायमस्वरूपी जतन करण्यासाठी
संग्राहलायाचे संचालक श्री.प्रकाश मगदूम यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका युगातील या श्रेष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा हा
अमूल्य ठेवा मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना अधिक समृद्ध झाला असून नवीन पिढीतील संशोधकांना याचा खूप उपयोग होणार असल्याचे’ श्री.मगदूम
यांनी सांगितले.दानवे कुटुंबाकडून प्रेरणा घेऊन इतरांनीही आदर्श घ्यावा आणि
सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याकडे असणारा दुर्मिळ ठेवा जतन करण्यासाठी
राष्ट्रीय चित्रपट संग्रहलयाकडे सुपूर्द करावा असे आवाहन यावेळी श्री.मगदूम यांनी केले.प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपट व नाट्य विषयक माहितीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.